महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' नगरसेवकांनी आम्हाला सल्ला देऊ नये; भाजपामध्ये गेल्यावर तिकीट मिळेल का हे पाहावे, मंत्री उदय सामंत कडाडले - UDAY SAMANT ON BJP CORPORATORS

भाजपाच्या नगरसेवकांनी केलेल्या विधानानंतर आज मंत्री उदय सामंतांनी थेट या नगरसेवकांना आम्हाला सल्ला देऊ नये, भाजपामध्ये गेल्यावर तिकीट मिळेल का हे पाहावे, असा टोलाही लगावलाय.

Industry Minister Uday Samant
उद्योगमंत्री उदय सामंत (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2025, 7:53 PM IST

पुणे- गेल्या तीन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांनी प्रवेश केलाय आणि काल झालेल्या पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच म्हटल्यानंतर महायुतीत वाद पेटताना पाहायला मिळतोय. या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेल्या विधानानंतर आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी थेट या नगरसेवकांना तुम्ही आम्हाला सल्ला देऊ नये, भाजपामध्ये गेल्यावर तिकीट मिळेल का हे पाहावे, असा टोलाही लगावलाय.

ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपामध्ये : आगामी विश्व मराठी संमेलनाच्या अनुषंगाने साहित्यिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे साहित्यिकांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपामध्ये गेलेत. जाताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केलीय. पण त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. भाजपामध्ये गेल्यावर तिकीट मिळेल का हे पाहावं. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विनंती आहेत की, जे लोक ठाकरेंना सोडून भाजपामध्ये गेलेत आणि आमच्यावर टीका करतायत त्यांची तोंडं बंद करावीत, असंही यावेळी उदय सामंत म्हणालेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन :यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. मुंबईनंतर वाशी आणि आता पुणे येथे हे संमेलन होत आहे. 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 असे तीन दिवस फर्ग्युसन महाविद्यालय येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. या साहित्य संमेलनात मराठीसाठी मोठे योगदान दिलेले एक ज्येष्ठ साहित्यिक त्याचबरोबर एक नवीन लेखकाचादेखील सन्मान करण्यात येणार आहे. त्याशिवाय मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व समित्यांचा, त्यातील साहित्यिकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

मराठी भाषकांनीही या संमेलनात समाविष्ट व्हावे :तसेच या संमेलनात बाल साहित्यापासून महिला, युवक, वयोवृद्धांपर्यंत अशा सर्वांनाच समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच मराठीसाठी योगदान दिलेले परंतु काही कारणामुळे ते पुढे येऊ शकले नाहीत, अशांनाही या संमेलनात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी भाषकांनीही या संमेलनात त्यांच्या इच्छेने आणि शासनाच्या प्रयत्नाने समाविष्ट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणालेत.

आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, ज्या लोकांनी तू राहशील नाही तर मी राहील, अशी भाषा केली होती आणि आमचं सरकार आल्यावर तुम्हाला बर्फावर झोपवू असं म्हटलं होतं, ते लोक जर आज मुख्यमंत्री यांना भेटत असतील तर याचा अर्थ त्यांना असुरक्षितता वाटत आहे, असंही यावेळी सामंत म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details