चंद्रपूर :नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 70 लाखांहून अधिक नवमतदारांची नोंद झाली. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केल्यानं हा मुद्दा आता पुन्हा चर्चेला आला आहे. ज्या-ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकले त्याच ठिकाणी सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
राजुरी विधानसभेत कथित बोगस मतदान : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात कथित बोगस मतदारांचा असाच प्रकार समोर आला होता. यात 6 हजारांपेक्षा जास्त बोगस मतदान झाल्याचं समोर आलं होतं. जिल्हा निवडणूक प्रशासनानं ही बाब निदर्शनास आल्यानंतर निवडणूक यादीतून ही नावं हटवून याबाबत गुन्हा नोंदवला होता. मात्र चार महिने लोटूनही हा प्रकार कोणी केला याचा थांगपत्ता प्रशासनाला लागलेला नाही.
काय आहे प्रकरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात 38 हजार 637 नव्या मतदारांची नोंद झाली. यापैकी राजुरा विधानसभा क्षेत्रात जवळपास 11 हजार नव्या मतदारांचा समावेश झाला. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात अचानक काही अनोळखी व्यक्तींची नावं समाविष्ट करण्यात आल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. विशेषतः ही नावं अमराठी व्यक्तींची होती. याबाबत संशय आला असता बीबी, गडचांदूर, कोरपना या ठिकाणी जे लोक तिथं राहातच नाहीत अशा व्यक्तींची नावं मतदार यादीत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी या संपूर्ण मतदारांची तपासणी अधिकाऱ्यांकडून करून घेतली असता यात 6 हजार 866 मतदारांची बोगस पद्धतीनं नावं आल्याचं समोर आलं. यानंतर ही नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. तसंच याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार देवराव भोंगळे हे जिंकले तर काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे पराभूत झाले होते.