नागपूर : 30 वर्षांपूर्वी 40 महिलांनी एकत्रित येत 'बीसी ग्रुप' सुरू केला. त्यानंतर पैसे बचत करण्याच्या उद्देशानं या महिलांनी सोसायटी काढली. महिलांच्या या उपक्रमावर लोकांनी विश्वास दाखवल्यानं आज या सोसायटीचं रूपांतर 'मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'त झालं. आज त्यांच्या सोसायटीची उलाढाल 2100 कोटी आहे, तर त्यांच्याकडं 1700 कोटी रुपयांच्या ठेवी सुरक्षित केल्या आहेत. 'दि धरमपेठ महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी' असं सोसायटीचं नाव असून महाराष्ट्रातच नाही, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळं ही सोसायटी आता मल्टी स्टेट झाली.
अडचणींवर मात करत नवा आदर्श निर्माण केला : सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सोसायटीचं रूपांतर बँकेत होणार आहे. महिलांनीही आर्थिक सक्षम व्हावं, या उद्देशानं 1994 मध्ये ही सोसायटी निलीमा बावणे यांनी सुरू केली. 30 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेल्या या रोपट्याचं आज वटवृक्ष झाला असून, शेकडो महिलांना यातून रोजगार उपलब्ध झालाय. 30 वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात महिलांचा वावर हा नगण्य होता. त्यामुळं या क्षेत्रात काम करताना अनेक संकटं आली. मात्र, निलीमा बावणे यांनी सर्व अडथळे पार करून एक नवा आदर्श निर्माण केलाय.
30 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला : निलीमा किशोर बावणे यांनी 1994 मध्ये म्हणजेच 30 वर्षांपूर्वी महिला सक्षमीकरणाशी संबंधित विचार डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेले प्रामाणिक प्रयत्न आज फळास आले. केवळ 50 रुपये गोळा करून सुरू झालेला हा प्रवास आज 2100 कोटींपर्यंत पोहोचलाय. सर्वसामान्य घरातील स्त्रिया काटकसरीनं थोडे थोडे पैसे बचत करतात. तांदळाच्या डब्यात तर कधी साखरेच्या डब्यात पैसे साठवून ठेवतात. त्यावर त्यांना व्याज मिळत नाही. हेच पैसे बँकेत ठेवल्यास महिलांना त्यावर व्याज मिळेल आणि अडचणीच्या काळात बँक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हे प्रत्येक घरातील महिला व पुरुष सदस्यांना पटवून देण्यात निलीमा बावणे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं. हळूहळू महिलांना निलीमा बावणे यांच्या सोसायटीवर विश्वास बसू लागला. त्यामुळंच आज 'दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह'चे सुमारे सव्वा लाख सभासद आहेत. निलीमा बावणे यांच्या अथक परिश्रमामुळं 30 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला.