ठाणे : बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनातील 10 आदिवासींची फसवणूक (Tribal Land Scam Case) झाल्यानं घोटाळा समोर आला. भूसंपादन केलेल्या जमिनीचे 74 लाख 50 हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळविण्यात आली. या प्रकरणात सत्ताधारी राजकीय पक्षातील नेत्यांची नावे समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बदलापूर कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
भूसंपादनातील फसवणूक प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांना अटक केली. त्याचबरोबर इत दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिलीय. तसंच या गुन्ह्यातील आणखी 4 ते 5 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
नेमकं काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जीजाबाई दिवेकर या अंबरनाथ तालुक्यात राहतात. त्यांची शेतजमीन बडोदा महामार्गाच्या कामी संपादित करण्यात आली. या मोबदल्यात त्यांच्या खात्यात 5 कोटी 77 लाख रूपये जमा झाले होते. त्यानंतर खातेदार नातेवाईकानं दहा वारसांच्या खात्यात ठराविक रक्कम वळती केली. मात्र, दिवेकर यांच्या ओळखीचे असलेल्या संजय गिरी नामक व्यक्तीनं रक्कम काढून देण्याच्या बहाण्यानं बँकेच्या पावत्यांवर आदिवासी बांधवांचे अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांना केवळ 1 लाख रुपये दिले. मात्र, काही दिवसांनी 9 लाख रूपये खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते झाल्याचे समोर आले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.