ठाणे : जमिनीच्या वादातून ५३ वर्षीय बांधकाम विकासकाची भररस्त्यात धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेतील शिवमंदिर रोड वरील मे. प्लायर गार्डन बिल्डींग समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- पोलिसांनी काही तासातच दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. सुरज विलास पाटील आणि हर्ष सुनिल पाटील ( रा. दुर्गादेवीपाडा, अंबरनाथ पुर्व ) असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर संजय श्रीराम पाटील (वय ५३ रा. दुर्गा देवी पाडा अंबरनाथ पुर्व ) असे निर्घृण हत्या झालेल्या बांधकाम विकासकाचं नाव आहे.
जमिनीच्या मालकीवरून वाद-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय श्रीराम पाटील हे अंबरनाथ मधील दुर्गा देवी पाडा भागात कुटुंबासह राहत होते. तर अटक आरोपीही याच भागात राहणारे आहे. संजय यांनी 19 वर्षापुर्वी अंबरनाथ पुर्व भागातील अतिरिक्त एम.आय.डी.सी. येथे शांताराम पाटील यांच्याकडून अंदाजे ५ एकर जमीन विकत घेतली होती. मात्र, त्यांनतर शांताराम पाटील यांनी सदर जमीन दुसऱ्या लोकांना विक्री केलेली असल्यानं जमिनीच्या मालकीवरून आरोपी विलास पाटील, सुरज विलास पाटील, हर्ष सुनिल पाटील यांच्यात वाद सुरू होता. याच जमिनीच्या वादातून २२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पूर्व, भागातील मे. प्लायर गार्डन बिल्डींग समोरील रस्त्यावरच सुरज विलास पाटील आणि हर्ष पाटील या दोघांनी संजय पाटील यांच्यावर धारदार शस्त्रानं २५ वार केले. गंभीर जखमा झाल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.