ठाणे Thane Crime News : सोसायटीमधील पार्किंगच्या वादातून मानसिक तणावात येऊन एका रेल्वे होमगार्डनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तपासादरम्यान मृत होमगार्डच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यावरुन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूषण लोटन मोरे (वय- 33) असं मृतकाचं नाव आहे. तर समीर देशमुख, सुभाष शेगर, दीपक शेलार, अनिल साळवी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पार्किंगवरुन वाद : मिळालेल्या माहितीनुसार, मृतक भूषण हा टिटवाळा पूर्वेकडील नांदप गावातील रवींद्र गॅलेक्सी नावाच्या सोसायटीत आई-वडील आणि भावासह राहत होता. तसंच गेल्या 12 वर्षांपासून तो होमगार्ड म्हणून मध्यरेल्वेत कार्यरत होता. मागील काही महिन्यांपासून वाहन पार्किंगवरून त्याचा सोसायटीतील रहिवाशांसोबत वाद सुरू होता. दिवसेंदिवस हा वाद वाढतच गेला. यावरुनच काही दिवसांपूर्वी भूषणनं सोसायटीच्या आवारात आपली दुचाकी पेटवली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादामुळं भूषण नेहमी मानसिक तणावात असायचा. अखेर 29 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यानं आत्महत्या केली.