मुंब्रा (ठाणे) - मराठी भाषा बोलणाऱ्यांवर हिंदी बोलणाऱ्यांची दंडुकशाही पुन्हा एकदा दिसून आली आहे. फळविक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगणाऱ्या तरुणाला जमावानं मारहाण केली. त्याच्याच विरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शोयब मोहम्मद नसीम कुरेशी (१९) असे फळविक्रेत्याचं नाव आहेत. तर विशाल गवळी (२१) असे अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे.
गुरुवारी दुपारी ३-३० वाजण्याच्या सुमारास विशाल गवळीनं फळविक्रेत्याकडून टरबूज घेतले. हे टरबूज वजनापेक्षा जास्त असल्यानं अधिक पैसे द्यावे लागतील असे, फळविक्रेत्यानं हिंदीत सांगितले. त्यावर विशाल गवळीनं हिंदीत काय बोलतो, मराठीत बोल असे म्हटलं. त्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. फळ विक्रेत्याशी भाषेवरून वाद झाल्यानंतर २० जणांनी मराठी तरुणावर कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं शुक्रवारी दिली.
नेमका वाद कशामुळे?गुरुवारी मुंब्रा परिसरात एका तरुणानं विक्रेत्याला मराठीत फळाची किंमत विचारली. त्यावर फळविक्रेत्यानं मराठी भाषा मला समजत नाही. हिंदीत बोलले पाहिजे, असे म्हटले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर तेथील जमावानं मराठी तरुणाला माफी मागण्यास भाग पाडलं. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरुणाला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावर शांतता भंग केल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. सायंकाळी फळ विक्रेत्याला पाठिंबा देणारा जमाव घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला.
- महाराष्ट्र एकीकरण समितीनं घडलेल्या प्रकारावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. समितीनं एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रशासनानं महाराष्ट्राची अशी गत केली आहे. मराठीची मागणी केल्यानं तेथील परप्रांतीयांनी जमाव करून मराठी मुलाला मारहाण करून माफी मागायला लावली. पोलीस या मुलालाच ठाण्यात घेऊन गेले. हे मराठी राज्यात घडत आहे".
मराठी माणसावर सातत्यानं हल्ले वाढले-‘मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’ असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या तरुणाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, " पोलिसांनी मराठी मुलावरच गुन्हा दाखल केला आहे. भविष्यात चौका-चौकात मराठी माणसाला मारले जाईल, असे वाटत आहे. मराठी माणसावर सातत्यानं हल्ले होत आहेत. मराठी माणसाबाबत अपमानास्पद गोष्टी घडत आहेत. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अशा घटना वाढत आहेत".
हेही वाचा-
- राज्यात चाललयं काय? अल्पवीयन मुलीच्या विनयभंगाच्या वादातून परप्रांतीयांकडून मराठी दांपत्याला मारहाण
- मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण; मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाच्या पत्नीसह सहा जणांना पोलीस कोठडी