महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेताना दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ, संजय राऊत म्हणाले... - terrorist attack in Jammu and Kashmir - TERRORIST ATTACK IN JAMMU AND KASHMIR

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू आणि 33 जण जखमी झाल्यानं देशभरातील राजकीय नेत्यांनी निषेध केला. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

terrorist attack in Jammu and Kashmir
terrorist attack in Jammu and Kashmir (Source- IANS/ETV Bharat Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 8:16 AM IST

Updated : Jun 10, 2024, 8:44 AM IST

मुंबई- दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यावेळी बस दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्यानं देशभरात संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह राज्यातील नेत्यांनी शोक व्यक्त केला.

माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांनी जम्मू काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे खूप धक्का बसला आणि दु:ख झाल्याचं म्हटलं. "माझे विचार आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत," असे शरद पवार यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, "जम्मू आणि काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल चिंतेत आहे. या लज्जास्पद आणि भ्याड हल्ल्यात जीव गमावला त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. मी इतर सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."

शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी दहशतवादी हल्ल्यावरून मोदी सरकारला जाब विचारला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, " यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना घडत होत्या. मोदी सरकारनं 370 हटवल्यानंतर जम्मूमध्येही दहशतवादी हल्ले होऊ लागले आहेत. यापूर्वी जम्मूमध्ये कधीही दहशतवादी हल्ले झाले नव्हते. मोदी शपथ घेत होते. त्याचवेळी जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते. आजही काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी परत जाणं शक्य होत नाही. मोदीजी, काश्मिरी पंडित घरी कधी परतणार?

काँग्रेस नेत्यांकडून शोक व्यक्त-काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी यांनी दहशतवादी हल्ल्याबाबत शोक व्यक्त केला. राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये म्हटले " मी सर्व कुटुंबांप्रती मनापासून संवदेना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो."

पंतप्रधान मोदींनी परिस्थितीचा घेतला आढावा-जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांनी दहशतवादी हल्ल्यात प्राण गमाविलेल्या नागरिकांच्या कुटुंबियाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्याचं नायब राज्यपाल यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल सिन्हा यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना शक्य मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी सर्व जखमींना शक्य तितकी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देशही दिले आहेत. नायब राज्यपाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, " रियासी येथील बसवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हुतात्मा झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या शोकमग्न भावना आहेत. सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या तिरस्कारजन्य कृत्यामागे असलेल्या सर्वांना लवकरच शिक्षा केली जाणार आहे." राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही-अमित शाह-देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, " जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथे यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं खूप दुःख झाले. लेफ्टनंट गव्हर्नर आणि जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक यांच्याशी बोलून घटनेची माहिती घेतली. या भ्याड हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. त्यांना कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल."

हेही वाचा-

  1. शिवखोडी यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला, 10 जण ठार - TERRORIST ATTACK ON PASSENGER BUS
Last Updated : Jun 10, 2024, 8:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details