मुंबईNeet Exam Fraud :एनटीएतर्फे घेण्यात आलेल्या नीट 2024 परीक्षेत एकाच परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांची नावे पूर्ण नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकूनही त्यांना कशी काय मंजुरी दिली गेली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान ही परीक्षा अत्यंत संशयाच्या वातावरणात झाली असून यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटीचा प्रकारही झाला असून त्यामुळे ही परीक्षाच आता रद्द करावी, अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही या परीक्षेबाबत आक्षेप नोंदवला असून याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशा पद्धतीने खेळले जाणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आता राज्यातील शिक्षक आणि पालक संघटनांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ही परीक्षाच रद्द करून सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
परीक्षाच रद्द करा - मोरे :नीट एक्झामचा जो धक्कादायक निकाल लागलेला आहे तो या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करणारा आहे. नीट एक्झाम घेणाऱ्या व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारा आहे. 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले यामागे घोटाळा आहे की, सॉफ्टवेअरची गडबड आहे हे शोधावं लागेल; मात्र ही परीक्षाच रद्द करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे नेते सुभाष मोरे यांनी केली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या मुलांवर जी परिस्थिती ओढवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच खूप मेहनत घेऊन मार्क मिळवलेली आहे, त्यांचं काय हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात? ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांचे फॉर्म मंजूर कसे होतात? हे प्रश्न आज उपस्थित झालेले आहे. सर्वांत मोठा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की, पैकीच्या पैकी गुण मिळवणारे खरे विद्यार्थी कोण आणि खोटे विद्यार्थी कोण? हे कसं ठरवायचं? दुसरा प्रश्न असा की, पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांतून प्राधान्य कोणाला द्यायचे? असे अनेक प्रश्न या नीट परीक्षेतून निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने नीट परीक्षा रद्द करून महाराष्ट्राने स्वतःची नीट परीक्षा घ्यावी, जेणेकरून महाराष्ट्रातील हुशार होतकरू मुलांना न्याय मिळेल, अशी मागणीसुद्धा मोरे यांनी केली.