दौंड Teacher Obscene Messages To Student : बदलापूर येथील घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यातील मळद गावातील एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बापुराव धुमाळ यास पोलीस पथकानं शुक्रवारी (23 ऑगस्ट) अटक केल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज :मळद गावातील एका शाळेत बापुराव धुमाळ हा शिक्षक शिकवत होता. त्यानं आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक घटना 22 ऑगस्टला उघडकीस आली. पीडित विद्यार्थिनीनं या प्रकाराची माहिती तिच्या वडिलांना दिली. विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकानंच अश्लील मेसेज केल्यानं विद्यार्थिनीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ शाळा गाठून त्या शिक्षकाला जाब विचारला. विद्यार्थिनीला शिक्षकानं अश्लील मेसेज केल्यामुळं संतप्त ग्रामस्थ या शाळेत दाखल झाले. यावेळी पालकांनी सदर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी काहीवेळ शाळेत तणाव निर्माण झाला.