मुंबई Salim Khan : प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी चित्रपट निर्माते-पटकथा लेखक सलीम खान यांना 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या' अशी धमकी देऊन दुचाकीवरुन पळून गेलेल्या प्रियकर आणि तिच्या प्रेयसीला शिवडी परिसातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वीच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वाहनांच्या ताफ्यात शिरकाव करणाऱ्या २१ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. या घटनेला २४ तास उलटत नाहीच तोच सलमान खानचे वडील सलीम खान यांना दुचाकीवरुन आलेल्या या प्रेमीयुगुलाने धमकी दिली होती. या दोन्ही घटनाप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय कायदा कलम २९२ (सार्वजनिक उपद्रव), ३५३ (२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३ (५) (सामान्य हेतूने केलेले गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री वांद्रे (पश्चिम) येथे अभिनेता सलमान खान घरी परतत असताना त्याच्या ताफ्यात घुसलेल्या उझैर मोईनुद्दीन (२१ ) या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
उमर आसिफ शेख (वय २६) आणि त्याची मैत्रीण अश्मा शेख (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या प्रेमीयुगुलाची नावं आहेत. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या प्रेमीयुगुलाच्या लक्षात ठेवलेल्या चार अंकी स्कूटर क्रमांक (७४४४) पोलीस पथकाने कार्टर रोड ते शिवडीपर्यंतचे ८० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासल्यानंतर दोघांना शिवडी परिसरातून गुरुवारी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांचे वडील सलीम खान हे बुधवारी सकाळी ८.४५ वाजता मॉर्निंग वॉक केल्यानंतर वांद्रे (पश्चिम) येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्स या निवासस्थानापासून २५० मीटर अंतरावर असलेल्या विंडरमेअर बिल्डिंगजवळ विसाव्यासाठी बसले होते. त्यावेळी एक ऍक्टीव्हा मोटारसायकलवरून बुरखाधारी महिला आणि एक पुरुष त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या'अशी धमकी देऊन दोघेही तेथून पळून गेले.
पळून जात असताना सलीम खान यांनी त्यांच्या मोटारसायकलचा शेवटचा चार अंकी क्रमांक लक्षात ठेवून अंगरक्षक पोलीस हवालदार दीपक बोरसे यांना माहिती दिली. अंगरक्षक बोरसे यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला. या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तत्काळ एक पथक त्यांच्या मागावर पाठवलं. सलीम खान यांनी दिलेल्या अर्धवट क्रमांकावरून पोलिसांनी कार्टर रोड ते शिवडीपर्यंतचे ८० सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता त्यात पोलिसांनी संशयित ऍक्टीव्हा मोटारसायकल आढळून आली. या मोटारसायकलच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरटीओ कडून माहिती मिळवून शिवडी परिसरातून उमर आसिफ शेख (वय २६) आणि त्याची मैत्रीण अश्मा शेख (वय २२) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली उमर आसिफ शेख याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा...