ठाणे Tansa Dam Overflow :शहापूर तालुक्यात एका आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं तानसा धरणा पाठोपाठ मोडक सागर धरणही ओव्हरफ्लो झालंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले असून 17484 क्युसेक वेगानं तानसा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर मोडक सागर या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 4978 क्युसेक वेगानं वैतरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तानसा धरणाचे 16 दरवाजे उघडले (Source - ETV Bharat Reporter) नदी काठच्या गावांना इशारा : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये चार धरणांपैकी तानसा आणि मोडक सागर ही दोन्ही धरणं ओसंडून वाहू लागली असून पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर येत्या दोन दिवसात भातसा आणि मध्यवैतरणा ही धरणही ओसंडून वाहू लागतील. त्यामुळं भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं मात्र मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
धरण 100 टक्के भरलं :बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी. टीएचडी इतकी आहे. तानसा धरण 100 टक्के भरलंय. धरणाच्या परिसरात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तर मोडकसागर धरणही 100 टक्के भरलं आहे. मागील दहा दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शहापूर तालुक्यातील धरणांच्या पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ : "शहापूर तालुक्यातील तानसा धरणा लगत असलेल्या भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा आणि खैरे या गावातील रहिवाश्यांनी सतर्क रहाण्याचे आदेश," जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिले आहेत. पावसामुळं रखडलेल्या शेतीच्या कामांना देखील वेग आला असून तालुक्यातील सर्व शेतजमिनी पाण्यानं भरलेल्या दिसत आहे. तसंच जून महिन्यात पाऊस न पडल्यानं येथील धरणातील पाणीसाठा कमी होत होता, त्यामुळं मुंबई मनपानं ठराविक ठिकाणी पाणी कपात केली. मात्र, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली असल्यानं तालुक्यातील भातसा आणि मध्य वैतरणा धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा
- साताऱ्यात पावसाचा जोर कायम! कोयना धरणातून सोडणार 42 हजार क्युसेक पाणी; पाणलोट क्षेत्रात 637 मिलीमीटर पावसाची नोंद - Koyna Dam Satara
- पावसामुळं अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांसाठी गुडन्यूज; 29 जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द - Mumbai Water Cut
- मुसळधार पावसाचा जोरदार फटका; गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, महामार्गावरील लॉंच सेवा बंद - Weather update Mumbai
- मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र 'या' तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी - Maharashtra Rain Updates