पुणे : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी पुणे महाड महामार्गावर ताम्हीणी घाटात घडली आहे. हे वऱ्हाड पुण्यातून महाड तालुक्यातील बिरवाडी इथं जाताना 5 जणांवर काळानं घाला घातला आहे.
खासगी प्रवासी बस उलटली :पुणे इथून जाधव परिवार बिरवाडी इथं लग्नानिमित्त जात होतं. यावेळी एका खासगी प्रवासी बसनं ( क्रमांक एस एच 14 जीयू 3404 ) सगळे वऱ्हाडी प्रवास करत होते. मात्र पुण्यातून बस निघून ताम्हीणी घाटात गेल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. या घटनेत 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 1) संगिता धनंजय जाधव, 2) गौरव अशोक दराडे, 3) शिल्पा प्रदिप पवार, 4) वंदना जाधव, 5) अनोळखी पुरुष अजुन नाव कळालं नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.