पुणे Swargate To Katraj Metro : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) तोंडावर केंद्र सरकारनं ठाणे आणि पुणे या शहरांना नव्या मेट्रो मार्गांची भेट दिली. ठाण्यासाठी 'ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पा'ला तर पुण्यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (टप्पा एक) 'स्वारगेट ते कात्रज' या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला.
2029 पर्यंत पूर्ण होणार मार्गिका : पुणे मेट्रो फेज एक प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास साडेपाच किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 2 हजार 954 कोटींचा हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या मेट्रोच्या माध्यमातून मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज हा परिसर कव्हर होणार आहे. फेब्रुवारी 2029 पर्यंत ही मार्गिका पूर्ण होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यातील दोन मोठ्या मेट्रो प्रकल्पांच्या घोषणा : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यातील दोन मोठ्या मेट्रो प्रकल्पांच्या घोषणा केल्या. केंद्र सरकारनं ठाणे आणि पुणे या शहरांना नव्या मेट्रो मार्गाची भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यासाठी 'ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प', तर पुण्यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (टप्पा एक) 'स्वारगेट ते कात्रज' मार्गाचं विस्तारीकरण या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रानं मंजुरी दिली.
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी : "ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प मंजूर झाला आहे. हा मेट्रो प्रकल्प 12 हजार 200 कोटी ऊपये खर्चून पूर्ण केला जाणार आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज असा 5.46 किलोमीटर लांबीचा मार्ग विस्तारीकरण प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 2 हजार 954.53 कोटी ऊपये आहे. ही लाईन 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचं लक्ष्य आहे," अशी माहिती केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.