मुंबई : स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून व्यापक स्तरावर डीप क्लिनिंग ड्राइव्ह मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, अद्यापही काही लोक रस्त्यावर कचरा टाकत असल्यानं पालिकेनं आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. वडाळा येथील एका मैदानावर काही लोक राडारोडा टाकताना आढळलं. त्यानंतर पालिकेनं पोलिसांत तक्रार दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार वडाळा येथील मोकळ्या मैदानामध्ये अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राडारोडा टाकण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेले आठ डंपर आणि एक पोकलँड ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर संबंधित वाहनांची नोंदणी रद्द करण्याबाबत परिवहन आयुक्तांना लेखी कळवण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना दिले आहेत.
वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंद : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राडारोडा टाकण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, असं असतानादेखील वडाळा येथील भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाच्या बाजूला एमएमआरडीएच्या मोकळ्या मैदानामध्ये डंपरच्या साहाय्याने काही व्यक्ती अनधिकृतपणे राडारोडा टाकत होते. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केली. यावेळी त्यांना तिथे राडारोडानं भरलेले चार डंपर, चार रिकामे डंपर आणि एक पोकलँड आढळून आलं. त्यानंतर लगेच त्यांनी पोलिसांत दिली. या तक्रारीप्रमाणे मेहबुब पटेल (बोनसरी गाव), राजू केसबन नायडू (विजय नगर), रामदास मोनू प्रसाद (कुर्ला), मोहम्मद सलीम इबारत अली (भांडूप), उजैर अहमद मोहम्मद इसहार खान (वडाळा) या वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुमारे 300 मेट्रिक टनांपर्यंतच्या राडारोड्याची वाहतूक : घरांची दुरुस्ती किंवा पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोडाची व्यवस्था करण्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून 'कॉल ऑन डेब्रिज' ही सुविधा तयार करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत सुमारे 300 मेट्रिक टनांपर्यंतचा राडारोडा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनातून वाहून नेत त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. राडारोडा घेऊन जाण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वाजवी शुल्क आकारलं जातं. 'कॉल ऑन डेब्रिजट सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी नियमानुसार राडारोडाची विल्हेवाट लावावी. त्यासाठी कोणत्याही अनधिकृत मार्गांचा अवलंब करू नये. आपल्याकडील राडारोडा घेऊन जाण्यासाठी तसंच, 'कॉल ऑन डेब्रिज' सुविधेसंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित विभाग कार्यालयातील सहायक अभियंता यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई : मुंबईतील कानाकोपऱ्यातील रस्ते तसंच अन्य ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यासोबतच रस्ते तसंच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करत प्रदूषणास कारणीभूत ठरणारी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक तसंच अन्य संबंधितांविरोधात दंडात्मक व अन्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. विविध भागांतील स्वच्छताविषयक कामकाजासाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी करण्यात आली असून, पथकांची नेमणूक करत नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.