मुंबई - विधानसभा निवडणुकीमुळं सध्या महाराष्ट्रात प्रचाराचा जोरदार धुरळा उडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. तर प्रचाराच्या तोफासुद्धा धडाडू लागल्यात. मात्र जपानसारख्या प्रगतिशील आणि विकसित देशात एका मराठी माणसाने राजकीय क्षेत्रात झेंडा रोवलाय. मूळचे अंबरनाथ येथील योगेंद्र पुराणिक हे जपानमध्ये एक टर्म म्हणून आमदार राहिलेले आहेत. योगेंद्र पुराणिक हे सध्या भारतात आले असून, "ईटीव्ही भारत"ने त्यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतलीय. भारत आणि जपान यांच्यातील परराष्ट्र संबंध, दोन देशांमधील राजकीय पार्श्वभूमी, शिक्षण आणि आरोग्य आदी विषयावर त्यांनी दिलखुलासपणे बातचीत केलीय. यावेळी भारतीय राजकारण आणि जपानमधील राजकारण याच्यामध्ये मोठी तफावत आहे. जमीन-अस्मानचा फरक असल्याचं जपानमधील माजी आमदार योगेंद्र पुराणिक म्हणालेत.
जपान शिस्तप्रिय देश : आपला जपान देशात प्रवास कसा सुरू झाला? यावर बोलताना माजी आमदार योगेंद्र पुराणिक म्हणाले की, मी 1990 साली पहिल्यांदा जपान देशात गेलो. सुरुवातीला विद्यार्थीदशेत असताना सामाजिक कार्याची आवड लागली. त्यानंतर खासगी क्षेत्रात नोकरी केली. हळूहळू जपानमधील राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळविला. त्यानंतर मी पहिल्यांदा आमदार झालो. आमदार झाल्यानंतर भारतातील राजकारण आणि जपानमधील राजकारण यातील मोठा फरक मला जाणवू लागला. भारतात प्रचारात मोठा गाजावाजा केला जातो. सत्ताधारी-विरोधक हे वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप करतात. मात्र जपानमध्ये असे काही होत नाही. जपानमध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात नाही. इथे प्रचारसुद्धा ठराविक वेळेत करावा लागतो. जनतेला त्रास होणार नाही, याची दखल घेतली जाते. तसेच निवडणुकीच्या काळात सत्ताधारी-विरोधी पक्षातील उमेदवार एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत नाहीत. जपान हा देश खूप छोटा असला तरी खूप शिस्तप्रिय आणि चांगला असल्याचंही योगेंद्र पुराणिक यांनी अधोरेखित केलंय.
भारतीय राजकारणाची चर्चा नाही : भारतात राजकारणासाठी भरपूर पैसा आणि वेळ खर्ची घालावा लागतो. इथे राजकारणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. परंतु जपानमध्ये भारतीय राजकारणाची चर्चा होत नाही किंवा भारतीय देशात राजकीय क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात, त्याची चर्चासुद्धा होत नाही. कारण जपानवासीयांना चर्चा करण्यास तेवढा वेळ नसतो. मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे, त्याबाबत थोडीफार चर्चा होते. मात्र एकनाथ शिंदेंनी जे बंड केले त्याची कोणतीच चर्चा जपानमध्ये दिसली नाही. भारत आणि जपान ह्या दोन देशात पहिल्यापासून चांगले संबंध आहेत आणि भविष्य काळातदेखील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही पुराणिक यांनी व्यक्त केलाय.
फोडाफोडीचे राजकारण नाही : भारतात ईव्हीएम मशीनवरून मोठा गदारोळ होत आहे. ईव्हीएम मशीन हटवावी, अशी मागणी विरोधकांनी केलीय. त्यामुळं जपान देशात मतदान ईव्हीएम मशीनमध्ये होते की? बॅलेट पेपरवर होते? असा प्रश्न पुराणिक यांना विचारला असता, जपानमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते. तसेच अतिशय पारदर्शक प्रक्रियेमध्ये हे मतदान होते. जपानमध्ये कुठलाही आक्रस्ताळेपणा नसतो किंवा एका उमेदवाराने दुसऱ्या पक्षात तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी प्रवेश केला, असे होत नाही. तसेच सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार कमी पडले तर दुसऱ्या पक्षातील आमदार फोडले जात नाहीत. थोडक्यात काय तर भारतात जसे फोडाफोडीचे राजकारण होते, तसे जपानमध्ये फोडाफोडीचे राजकारण होत नाही. तसेच तिथे सोशल मीडियाच्या आहारी तिथली लोक गेली नाहीत. वेळेचे बंधन आणि कामाचं बंधन तिथे असते, तसेच तिथले लोकं एका सचोटीमध्ये जीवन जगतात, असं पुराणिक सांगतात.
सामाजिक कार्याचे भान : जपान हा छोटा देश असला तरी त्यांनी विविध क्षेत्रात चांगली प्रगती केलीय. कारण तेथील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाविषयी काहीतरी करण्याची इच्छा असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जपानवासीयांमध्ये सामाजिक बांधिलकी याविषयी जागृती असते. त्यांच्यामध्ये थोडंफार काहीतरी समाजासाठी करण्याची भावना असते. दुसऱ्याला मदत करण्याची भावना जपानवासीयांमध्ये असते. विनाकारण कुठलाही इथे वाद निर्माण केला जात नाही. तसेच विनाकारण दुसऱ्याला त्रास दिला जात नाही म्हणून आज जपान जरी छोटा देश असला तरी त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठी प्रगती केल्याचं पुराणिक म्हणालेत.
हेही वाचा -