महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

का झालं राजू शेट्टींचं 'डिपॉझिट' जप्त; पराभवानंतर शेट्टींची भावनिक पोस्ट - Hatkanangale Lok Sabha results - HATKANANGALE LOK SABHA RESULTS

Hatkanangale Lok Sabha results : काही दिग्गज नेत्यांनाही लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रामाणिक राहणं माझी चूक आहे का, असा प्रश्न जनतेला केलाय.

Raju Shetty
राजू शेट्टी (ETV Bharat Maharashtra Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 6:46 PM IST

कोल्हापूरHatkanangale Lok Sabha results :कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा 13 हजार 399 मतांनी विजय झाला. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा निसटता पराभव झालाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, मात्र आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. शेट्टी यांना अवघी 1 लाख 79 हजार 850 मतं मिळाली. शेट्टी यांचा सलग दुसरा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असून 'प्रामाणिक राहाणं माझी चूक झाली का?' अशी त्यांची पोस्ट सोशल मीडियावरील व्हायरल होत आहे. मात्र, विधानसभा मतदारसंघात फेरबदल झाल्यामुळंच राजू शेट्टी यांचं लोकसभेचं गणित बिघडल्याचं दिसून येत आहे.

मतदारसंघाची 2009 साली पुनर्रचना :तत्कालीन इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची 2009 साली पुनर्रचना होऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राजू शेट्टी पहिल्यांदा लोकसभेवर मोठ्या फरकानं निवडून गेले. यानंतर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला होता. त्यामुळं शेतकरी, अल्पसंख्याक समाजाच्या मतावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांनी पुन्हा गुलाल खेचून आणला. तसंच शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांचा शेट्टी यांनी पराभव केला.

तिरंगी लढतीत शेट्टींचा दारुण पराभव :2019 पासून गेल्या पाच वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा, वाळवा, गगनबावडा, इस्लामपूर, शिरोळ, इचलकरंजी या भागात शेट्टी यांनी चांगला जनसंपर्क वाढवला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत शेट्टींचा दारूण पराभव झाला. त्यांच्या पराभवाच्या कारणांचा विचार केल्यास, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आवाज उठवणे, मतदार संघातील इतर महत्त्वाच्या विषयाकडं दुर्लक्ष, नव्या दमाच्या मतदारांना आकर्षित करण्यात कुचराई, मतदारसंघातील साखर सम्राटांचा विरोध, मुस्लिम, दलित मतदारांनी फिरवलेली पाठ, यामुळं राजू शेट्टी सलग दोन वेळा पराभूत झाले.

जातीय समीकरणं महत्त्वाची :हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं मराठा, जैन समुदायांची ताकद मोठी आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांनी 32 हजार 696 इतकी मते मिळवल्यानं याचा थेट फटका राजू शेट्टींना बसला. दुसरीकडं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर, धैर्यशील माने मराठा समाजाचे असल्यानं त्यांच्यात मतांची विभागणी झाली. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला होता. हातकणंगले तालुक्यात बौद्ध समाजाची मतं निर्णायक ठरली. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असल्यामुळं शेट्टींचं मताधिक्य घटलं. शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रतिनिधित्व नसलेल्या समाजानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांची साथ सोडल्याचं दिसून येत आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. त्यामुळं आगामी निवडणुकात शेट्टींना पक्षाची रचना बदलावी लागणार आहे.

काय आहे विधानसभेचं गणितं : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, जनसुराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, मानसिंगराव नाईक अशा आमदाराचं त्यांना आव्हान असणार आहे. तसंच या आमदारांचे साखर कारखाने असल्यानं प्रत्येक गळीत हंगामात राजू शेट्टी त्यांच्याविरोधात आंदोलन करतात. त्यामुळंच राजू शेट्टींना विळ्या-भोपळ्याचं नातं महागात पडल्याची चर्चा मतदारसंघात रंगलीय. या मतदारसंघातील आमदारांनी सोयीची भूमिका घेत राजू शेट्टींना साईडलाईन केल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसतंय. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडं अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलंत का :

  1. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024
  2. 'मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है,..'; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुख्यमंत्री शिंदेंची कविता, दिला जाहीर पाठिंबा - NDA Meeting
  3. विदर्भात महायुतीचं अपयश कशामुळं? काय असतील कारणं? वाचा... - LOKSABHA ELECTIONs 2024

ABOUT THE AUTHOR

...view details