मुंबई Kuwait Boat Near Gateway Of India : मुंबई पोलिसांना 6 फेब्रुवारीला सकाळी 'गेटवे ऑफ इंडिया'च्या परिसरात एक संशयास्पद बोट फिरताना दिसली. पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता, ती बोट कुवेतची असल्याचं समजलं. 'अब्दुला शरीफ 1' असं या बोटीचं नाव आहे. बोटीवरील तिन्ही व्यक्ती भारताचे नागरिक असून ते तामिळनाडूचे रहिवासी आहेत. ते व्यवसायानं मासेमार आहेत. ही बोट ही विनापरवाना भारताच्या समुद्री हद्दीत फिरत होती. पोलिसांनी बोट आणि त्यावरील व्यक्तींना ताब्यात घेतलंय. यलो गेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी ही माहिती दिली.
काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील व्यक्ती कामाच्या शोधात होते. तेव्हा तामिळनाडूमधील एका एजंटनं त्यांना दोन वर्षांपूर्वी कुवेत इथं पाठवलं. गेल्या दोन वर्षांपासून ते कुवेत इथं 'अब्दुला शरीफ 1' या बोटीवर मासेमारी करत होते. मात्र या दोन वर्षामध्ये बोटीच्या मालकानं त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. तसेच त्यांना मालकाकडून मारहाण देखील केली जात होती. मालकानं त्यांचे भारतीय पासपोर्ट जप्त करून घेतले. तसेच त्यांना काम सोडून गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.