बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण सध्या तापलेलं आहे. बीडच्या रस्त्यावर जनतेच्या असंतोषाचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान हे प्रकरण सीआयडीकडं गेल्यानंतर फरार संशयित आरोपी वाल्मीक कराडसह चारही आरोपींचे बँक खाते सीज करण्यात आले आहेत. संपत्ती जप्तीची कारवाई सीआयडीनं सुरू केली असून संतोष देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याचं तपासातून उघड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सीआयडी तपासाला वेग :शनिवारी बीडच्या रस्त्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायासाठी जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. जनक्षोभ लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश सीआयडीला दिले. यानुसार सीआयडीनं वाल्मीक कराडसह फरार असलेल्या चारही आरोपींचे बँक खाते सिज करून संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली आहे. खून आणि खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीची नऊ पथक सध्या करत असून जवळपास दीडशे अधिकारी आणि कर्मचारी ही जबाबदारी संभाळत आहेत. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात संतोष देशमुख खून झाला त्यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीतील बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशाशी मॅच झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संतोष देशमुखचा खून केल्यानंतर आरोपींचा एका राजकीय नेत्यांशी संवाद ? :दरम्यान गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या गाडीत दोन मोबाईल सापडल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. या दोन मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्यात सीआयडीला यश आले आहे, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्यांशी संपर्क साधल्याची बाब देखील तपासात उघडकीस आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी केलेल्या चित्रीकरणातून देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केली असल्याची बाब उघडकिस आली आहे. सीआयडीची पथकं फरार आरोपींचा तपास राज्यासह देशभरात सध्या करत आहे. आरोपींच्या संपत्ती जप्ती सोबतच त्यांनी देशाबाहेर पलायन करू नये, यासाठी पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई सुरू केली असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- संतोष देशमुख हत्याकांड : धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, अंजली दमानिया आक्रमक, म्हणाल्या 'आक्रोश मोर्चा केवळ राजकीय'
- रुपाली ठोंबरे पाटील यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
- बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका