अमरावतीLOK SABHA ELECTIONS : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना भाजपानं उमेदवारीसाठी चार दिवस वेटिंगवर ठेवलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री शाह वेळ देत नाहीत. अशा परिस्थितीत पक्षात प्रवेश करण्याआधीच नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली जाते. लगेच दुसऱ्या दिवशी अमित शाह, नवनीत राणा यांच्या भेटीचा योग जुळून येतो. त्यामुळं नवनीत राणा या भाजपाच्या सर्व नेत्यांपेक्षा शिरजोवर होताना दिसत असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलीय. अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
देवेंद्र फडणवीस यांना अंधारेंचा टोला :देवेंद्र फडणवीस यांना मोदी, शाह वेटिंगवर ठेवतात. मात्र, नवनीत राणांना ते सहज भेटतात. यावरून भविष्यात महाराष्ट्रातील भाजपाच्या सत्तेचं केंद्र नागपूरवरून अमरावतीला येणार असल्याचं वाटतंय. चंद्रकांत पाटील, सुधीर मुंगटीवार यांच्यासारखे वाटेत आडवे येणारे अनेक काटे देवेंद्र फडणवीसांनी दूर केलेत. असं असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षाही नवनीत राणा यांचं राजकीय वजन वाढताना दिसतंय. याकडं देवेंद्र फडणवीस यांनी बघायला हवं. नवनीत राणा या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 'खतरे की घंटी' आहे, असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
महाविकास आघाडीनं फोडला प्रचाराचा नारळ :अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी नेहरू मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या तथा अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख, शिवसेनेचे नेते अनंत गुढे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी जाहीर सभेला उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या पहिल्याच जाहीर सभेला नेहरू मैदानावर मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.
छत्रपतींच्या वंशजांपेक्षा राणांना महत्त्व :छत्रपती शाहू महाराजांच्या वारसदारांना महाविकास आघाडीनं त्यांच्या घरी जाऊन अत्यंत सन्मानानं उमेदवारी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणारे उदयनराजे भोसले यांना महायुतीनं मात्र चार दिवस वेटिंगवर ठेवलं. खरंतर भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांची काही किंमतच वाटली नाही, हे दुर्दैव असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची संपूर्ण धुरा असताना भाजपाचे नेते महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीवरून मातोश्रीवर यायचे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला बोलावलं जातं. त्यांना देखील वेटिंगवर ठेवलं जातं, अशी परिस्थिती असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.
विकास नसल्यामुळं फुकटात रेशन वाटपाची वेळ : 2014 पासून देशातील भाजपा सरकारनं केवळ खोटी आश्वासनं दिली. दोन कोटी युवकांना रोजगार देणार असं भाजपानं सांगितलं होतं. मात्र कोणालाच रोजगार मिळाला नाही. देशात कुठे विकास केला गेला नसल्यामुळं केंद्रातील भाजपा सरकारला देशातील जनतेला फुकटात रेशन देण्याची वेळ आली आहे. देशातील जनतेला असं फुकटचं रेशन नकोय. देशातील प्रत्येक नागरिकांच्या हाताला काम हवं आहे. विकास हवा आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.