बारामती (पुणे) :'' पक्ष स्थापन करणाऱ्या संस्थापक अध्यक्षाकडून तो हिसकावून दुसऱ्याला देण्याची घटना या देशात पहिल्यांदाच घडली. अर्थात यामागं देश चालविणारी अदृश्य शक्ती आहे. या शक्तीनं आम्हाला कितीही धमकावलं. अन्याय अथवा घात केला तरी त्यांच्या विरोधातील आमची लढाई सुरूच राहील'', असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ''हा देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालला पाहिजे. मात्र, आता हा देश अदृश्य शक्ती स्वतःच्या मर्जीनं चालवताना दिसत आहे. अशी परिस्थिती असली तरी आमचा संघर्ष सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयातील लढ्यात त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह देता कामा नये. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की, या देशात लोकशाही आहे. चुकीच्या पद्धतीनं चिन्ह काढून घेतल्यानं शेजारच्या देशात काय परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही पाहत आहात. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालाबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो.''
शून्यातून सुरुवात करून उभे राहू:खासदार सुळे म्हणाल्या, ''या देशात वकील किंवा अन्य कोणाची मनमानी चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आम्ही तात्काळ निवडणूक आयोगाला दिली. मेरिटनुसार आम्हाला मूळ पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळणं अपेक्षित होतं. परंतु, अदृश्य शक्तीच्या मनमानीमुळे ते मिळालं नाही. तरीही आम्ही घाबरणार नाही. शून्यातून सुरुवात करून उभे राहू. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि नवीन तुतारी चिन्ह यापुढे काय करेल तुम्ही पाहाल''.