नाशिकGood Handwriting Tips:इंटरनेट आणि मोबाईल सारख्या डिजिटल युगात विद्यार्थीना हातानं लिहिण्याची सवय कमी झालीय. त्यामुळं मुलांचं हस्ताक्षर चांगलं व्हावं यासाठी यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये पालक हस्ताक्षर कार्यशाळेला पसंती देत आहेत.
कोविड-19 महामारीच्या काळात ऑनलाईन शालेय शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं आता पालक ही मुलांबाबत जागृत झाले आहेत. यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये खेळासोबतच हस्ताक्षर कार्यशाळेला पसंती देत आहेत. हस्ताक्षर चांगलं असल्यानं स्वतःचं वेगळेपण सिद्ध होते. पण हस्ताक्षरामुळं संयम आणि जगण्यात शिस्तही लागते. जन्मतः हस्ताक्षर कोणाचंही चांगलं नसतं. चांगलं हस्ताक्षर हवं असेल तर सराव हाच एक पर्याय आहे. पेन आणि पेन्सिलच्या साहाय्यानं सरळ, वक्राकार, गोलाकार अक्षरं गिरवल्यावर मेंदूचा विकास होतो, असं सिध्द झालंय असं सुलेखनकार पूजा निलेश सांगतात.
मुलांचा सराव घ्यावा:हस्ताक्षर एका दिवसात सुधारत नाही. त्यासाठी सराव आणि सातत्य महत्त्वाचं आहे. मुलांचं चांगलं हस्ताक्षर होण्यासाठी पालकांनी मुलांचा लिहिण्याचा सराव घ्यावा त्यामुळं हस्ताक्षर चांगलं होण्यास मदत होईल. मुलांना स्वतःच्या हस्ताक्षरात भाऊ, बहीण, काका, मावशी आणि मामा यांना पत्र लिहण्यास सांगावे. यातून त्यांना लिहिण्याची सवय लागते.