शिर्डी : शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिर्डी ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तब्बल सात कलमी कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.
काय म्हणाले विखे पाटील? : या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की, "रात्री अकरा वाजेनंतर शिर्डीमधील सर्व व्यवसाय पुर्णपणे बंद राहतील. अगदी चहाचं दुकान देखील खुलं राहणार नाही. रात्री साडे अकरानंतर शिर्डीत विनाकारण रस्त्यावर फिरण्यास असणार मनाई असेल. जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. शिर्डीत एकाप्रकारे संचारबंदीचाच फॉर्मुला राबवला जाणार आहे. 'शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट' स्थापन करण्यात येणार असून त्या अंतर्गत शिर्डी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरं ताब्यात घेतली जातील. खंडोबामंदिर, हाजी अब्दुलबाबा समाधी, लक्ष्मीआई मंदिर, मारुती शनी, गणेश मंदिर आणि इतर मंदिरांचे खासगी ट्रस्ट बरखास्त करण्यात येतील." तसंच शिर्डीत बाहेरुन येणाऱ्या व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात येणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.