मुंबई Maharashtra Cyber Cell: सायबर गुन्हेगार दररोज नवनवीन कट आखून अनेकांना गंडा घालतात; परंतु महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जातात. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1930 हा हेल्पलाइन क्रमांक 24x7 सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी काम करतो. महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीवरून असे सूचित होते की, सन 2022 मध्ये 4554 लोकांनी हेल्पलाइनद्वारे सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवली. या तक्रारदारांकडून अंदाजे 4.45 कोटी रुपयांची फसवणूक केली गेली होती. त्यापैकी 1.63 कोटी पोलिसांनी यशस्वीरित्या गोठवले.
एवढ्या रुपयांची केली बचत :2023 मध्ये सायबर पोलिसांना राज्यभरातून 66 हजार 374 तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यात एकूण 440 कोटी रुपयांची फसवणूक झाली. यापैकी सायबर पोलिसांना 54.16 कोटी वाचवण्यात यश आले. मात्र, एप्रिल 2024 पर्यंतची आकडेवारी धक्कादायक आहे. 2024 या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत, महाराष्ट्र सायबर पोलिसांना 52 हजार 673 तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यात 604 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा समावेश आहे. या ६०४ कोटी रुपयांपैकी ६१.३९ कोटी रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. 2022 ते एप्रिल 2024 पर्यंत, एकूण 1 लाख 24 हजार 164 लोकांनी हेल्पलाइन क्रमांक 1930 वर सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या. सायबर गुन्हेगारांनी या तक्रारदारांची एकूण 1093 कोटी रुपयांची फसवणूक केली, तर प्राप्त तक्रारींच्या आधारे पोलिसांनी 116.63 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत.
शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले अन् :महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने एक घटना सांगितली. जिथे पुण्यातील एका व्यावसायिकाने सायबर गुन्हेगारांनी त्याची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइनवर कॉल केला. त्यांनी 1930 वर तक्रार नोंदवली. त्यानंतर सायबर पोलिसांना 97 लाख वाचवण्यात यश आलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, तक्रारदाराने नफा कमावण्याच्या नावाखाली दोन महिने शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवले होते; परंतु त्याचे पैसे परत न मिळाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.