चेन्नई - Sardar 2 Stuntman Death : तमिळ चित्रपटसृष्टीतून एक अतिशय हृदय पिळवूटून टाकणारी बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता कार्ती (अभिनेता सूर्याचा भाऊ) च्या आगामी 'सरदार 2' चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना स्टंटमॅन इझुमुल्लईचा मृत्यू झाला. इझुमुलई हे 'सरदार 2' चित्रपटासाठी एका अॅक्शन सीनचे शूटिंग करत होते आणि याच दरम्यान 20 व्या मजल्यावरून पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. इझुमुलई यांच्या निधनामुळे सेटवर शोककळा पसरली असून चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. चेन्नईतील सालीग्रामम येथील प्रसाद स्टुडिओमध्ये १५ जुलैपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून आता पोलीस त्याचा तपास करत आहेत.
मिळालेल्या बातमीनुसार, पडल्यामुळे स्टंटमनला गंभीर दुखापत झाली होती, परंतु अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर शूटिंग थांबवण्यात आले आहे. 'सरदार 2' चित्रपटाचे दिग्दर्शक पीएस मिथरान, अभिनेता कार्ती आणि प्रॉडक्शन हाऊसकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.