महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 1 hours ago

ETV Bharat / state

दिल्लीत मराठी माणसाचा डंका! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तब्बल २८०० रुपयांना त्यांच्या नावानं मिळतो चहा, 'या' अवलियानं लिहिल्यात कादंबऱ्या - Laxmanrao Shirbhate

Laxmanrao Shirbhate : तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, यश नशिबानं मिळतं. परंतु, 70 वर्षांच्या लक्ष्मणराव शिरभाते यांनी हे खोटं ठरवलं. ज्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर चहा (Tea) विकून एका प्रसिद्ध 5 स्टार हॉटेलमध्ये आपलं नाव कोरलं आहे. 'लक्ष्मणराव हाय टी' हा 2800 रुपयांचा चहा, शांग्रीला हॉटेलमध्ये खास लक्ष्मणरावांच्या नावानं मिळतो. तसंच चहाबरोबर त्याच्या लेखनाचं ही कौतुक केलं जात आहे.

Laxmanrao Shirbhate
लक्ष्मणराव शिरभाते (Etv Bharat Reporter)

अमरावती Laxmanrao Shirbhate: एखाद्याच्या आयुष्याला कधी आणि कशी सकारात्मक कलाटणी मिळेल याचा नेम नाही. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील रहिवासी असणारे लक्ष्मणराव शिरभाते हे अमरावतीच्या सूतगिरणीत कामाला होते. सूतगिरणी बंद पडली. एक पुस्तक लिहायचं आणि रोजगार मिळवायचा म्हणून त्यांनी थेट दिल्ली गाठली. दिल्लीत चक्क रस्त्यावर त्यांनी चहा (Tea) विकला. पुस्तक लिहिण्याचं आणि ते प्रकाशित करण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं. आज दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये लक्ष्मणराव यांनी बनवलेला चहा 2800 रुपयाला विकला जातो. पंचतारांकित हॉटेलमध्ये 'टी कन्सल्टंट' अशी नोकरी करताना लक्ष्मणराव पुस्तक देखील लिहितात. चित्रपटात शोभणाऱ्या कथानकाप्रमाणे अनोखा प्रवास असणाऱ्या लक्ष्मणराव शिरभाते यांच्या यशस्वी प्रवासा संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.



लक्ष्मणराव असे पोहोचले दिल्लीत :अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात असणारं 'तळेगाव दशासर' हे लक्ष्मणराव शिरभाते यांचं मूळ गाव. या गावात त्यांचा जन्म झाला. इयत्ता आठवी पर्यंतचं शिक्षण गावातच झालं. नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी ते अमरावतीत आले. शिक्षण अर्ध्यावर सोडून त्यांनी बडनेरा मार्गावर असणाऱ्या सूतगिरणीत नोकरी केली. सूतगिरणीत पाच वर्ष काम सुरू असतानाच अचानक ती बंद पडली. याच दरम्यान त्यांच्या गावातील एक युवक नदीत बुडून दगावला. या घटनेमुळं व्यथित होऊन त्यांनी रामदास नावाची कादंबरी हिंदी भाषेत लिहिली. आपलं पुस्तक प्रकाशित व्हावं, आपण देखील लेखक व्हावं असं त्यांना वाटायला लागलं. काही रोजगार मिळावा आणि पुस्तक प्रकाशित व्हावं या उद्देशानं त्यांनी 1977 मध्ये थेट दिल्ली गाठली.

प्रतिक्रिया देताना लक्ष्मणराव शिरभाते (ETV Bharat Reporter)



दिल्लीत रस्त्यावर थाटलं दुकान : आपण लिहिलेली कादंबरी दिल्लीतील एका प्रकाशकाकडं नेली असता त्यांनी आधी पैसे विचारले आणि नंतर बाहेरचा रस्ता दाखवला. पुस्तक प्रकाशनासाठी पैसे हवे असल्यानं दिल्लीतील रस्त्यावरच पान, बिडी, सिगारेट विकण्याचं दुकान थाटलं. काही दिवसांनी याच जागेवर चहा विकण्यास सुरुवात केली. त्यांचा चवदार चहा पिण्यासाठी गर्दी व्हायला लागली. या व्यवसायातून पैसे जमले आणि त्यातून पहिलं पुस्तक 'रामदास' हे प्रकाशित केल्याचं लक्ष्मणराव शिरभाते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

इंदिरा गांधींनी घेतली दखल : दिल्लीच्या रस्त्यावर एका झाडाखाली पान, बिडी, सिगारेट आणि चहा विकणारा युवक पुस्तक देखील लिहितो. यासंदर्भात 1981 मध्ये एका नामांकित वृत्तपत्रात लेख छापून आला. या लेखाची दखल घेत त्यावेळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेटायला बोलावलं. त्यांनी भेटून प्रशंसा केली. यामुळं आणखी पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली असं लक्ष्मणराव शिरभाते सांगतात.

इंदिरा गांधींच्या प्रश्नामुळं मिळाली शिक्षणाची प्रेरणा : "पान, बिडी ,सिगारेट आणि चहा विकून पुस्तकं देखील लिहितो किती शिकलास? असा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारला होता. त्यांचा प्रश्न ऐकून मला पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे असं वाटलं. यानंतर मी बारावीची परीक्षा दिली. 1986 मध्ये माझं लग्न झालं. वयाच्या 40 व्या वर्षी मी कला शाखेत पदवी मिळवली. वयाच्या 63 व्या वर्षी हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. आता माझं वय 70 वर्ष असून आता इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत", असं लक्ष्मणराव शिरभाते यांनी सांगितलं.



शांग्रीला हॉटेलमध्ये लक्ष्मणरावांच्या नावानं 'हाय टी' : लक्ष्मणराव शिरभाते यांचं रस्त्यावरील चहाचं दुकान हे सुरू असताना, तसंच त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित होत असतानाच त्यांच्या संदर्भात भारतात आणि परदेशात वृत्तपत्रांमध्ये छापून यायचं. त्यांच्या चवदार चहाचं वृत्त वाचूनच दिल्ली येथील 'शांग्रीला' या नामांकित पंचतारांकित हॉटेलमधून लक्ष्मणराव शिरभाते यांना खास चहासाठी बोलावण्यात आलं. सुरुवातीला इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये जाण्यास लक्ष्मणराव शिरभाते यांनी नकार दिला. मात्र, तीन-चारदा बोलावण्यात आल्यावर लक्ष्मणरावांनी शांग्रीला हॉटेल गाठलं. या हॉटेलमध्ये तीन वर्षांपासून 'टी कन्सल्टंट' म्हणून ते काम करतात. विशेष म्हणजे 'लक्ष्मणराव हाय टी' हा 2800 रुपयांचा चहा, शांग्रीला हॉटेलमध्ये खास लक्ष्मणरावांच्या नावानं मिळतो हे विशेष.


राष्ट्रपतींनी सहकुटुंब केला सत्कार : लक्ष्मणराव यांची ख्याती माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत देखील पोहोचली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी लक्ष्मणराव शिरभाते यांचा सहकुटुंब सत्कार केला. लक्ष्मणरावांच्या पत्नी रेखा या गृहिणी असून मोठा मुलगा हितेश हा एमबीए झाला असून बँकेत तो नोकरीला आहे. लहान रितेश हा अकाउंटचं काम करतो. "आज अनेक वर्षांपासून दिल्लीला राहत असलो तरी माझी नाळ ही माझ्या अमरावती जिल्ह्याची जोडली असून आम्ही चौघंही नेहमीच आमच्या तळेगाव दशासर या गावात येतो", असं लक्ष्मणराव सांगतात.



लक्ष्मणराव शिरभातेनी लिहिलेली पुस्तकं : लक्ष्मणराव शिरभाते यांनी आपलं संपूर्ण लिखाण हे हिंदी भाषेत केलं. रामदास ही पहिली कादंबरी. यानंतर त्यांनी आणखी सहा 'उपन्यास' आणि चार नाटकं लिहिली. यामध्ये रामदास, रेणू, वंश, प्रतिशोध, हस्तीनापूर, अध्यापक, नर्मदा यांचा समावेश आहे. यासह नवयुवक, शिकास, बेटीया, अभिव्यक्ती, दृष्टिकोन, अहंकार, असे हिंदी कथासंग्रह त्यांनी लिहिले. भारतीय राजनीति एवम मौलिक सिद्धांत यासह अनेक विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिलीत.

हेही वाचा -

  1. आंब्यांसोबत इतर पिकांचीही भरभराट; शेतात चर खोदून अमरावतीच्या माजी महापौरांचा नवा प्रयोग - Agriculture News
  2. छत नसलेलं 'आनंदेश्वर' मंदिर आहे आश्चर्याचा खजिना, श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी - Anandeshwar Mahadev Temple
  3. सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple
Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details