महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य अल्पसंख्याक आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर; २२ शाळांचा दर्जा काढण्याचे निर्देश - MAHARASHTRA MINORITY PANEL

राज्य अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शाळांमध्ये प्रचंड अव्यवस्था आणि गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी आयोगाला मिळाल्या. यानंतर आयोगाचे अध्यक्षांनी मोठी कारवाई केली.

MAHARASHTRA MINORITY PANEL
शाळांना भेट देताना महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2025, 7:41 PM IST

Updated : Feb 12, 2025, 8:34 PM IST

नागपूर : राज्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये अव्यवस्था आणि गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक आयोगाला मिळाल्या आहेत. अशा शाळा तत्काळ बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराच महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिला. प्यारे खान मंगळवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल केला असून, २२ शाळांचा अल्पसंख्याक दर्जाच काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. एवढंच नाही तर, ज्या शाळेतील गैरप्रकार समोर येतील त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, असा इशारा प्यारे खान यांनी दिला.

कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस करणार : अल्पसंख्याक शाळेत सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी अनेक शाळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी अत्याचाराच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या संदर्भात अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष प्यारे खान यांना सूचना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच अकोला गाठलं आणि एका उर्दू शाळेत धडक दिली. त्यावेळी महिला शिक्षकांनी शाळा संचालक विरोधात तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. शाळा संचालकांविरोधात शेकडो तक्रारी प्राप्त होताच प्यारे खान यांनी या संस्थेच्या शाळांचा अल्पसंख्याक दर्जाच काढून टाकण्याचे निर्देश दिले. एवढंच नाही तर, शाळा संचालकांविरोधात गुन्हा दाखल करून मकोकासह एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

शासकीय निधीचा दुरुपयोग :"महाराष्ट्रात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८५० शाळा सुरू आहेत. मात्र, या शाळांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. शासनाकडून आलेला पैसा दलाल खात आहेत. त्यामुळं शाळांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. तसंच राज्यातील सर्व जिल्ह्याचा दौरा करणार आहे," अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली.

महिलांच्या तक्रारीवर कारवाई करणार : एसपी : प्यारे खान यांनी अकोला दौरा केल्यानंतर आता अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. "महिलांनी न घाबरता पुढे येऊन आरोपींविरोधात तक्रार करावी," असं आवाहन पोलिसांनी केलं.

हेही वाचा :

  1. रश्मिका मंदान्नाला विकी कौशलनं शिकवलं मराठी, जोडीनं घेतलं शिर्डीत साईबाबांचं दर्शन, पाहा व्हिडिओ
  2. पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याचा दावा, मुंबई पोलिसांना मिळाली धमकी
  3. माजी मंत्री तानाजी सावंतांनी सर्व यंत्रणांना लावलं कामाला; पोलिसांनी खर्च वसूल करावा; शिवसेनेकडून निवेदन
Last Updated : Feb 12, 2025, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details