मुंबई State Government Relief To Farmers : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. राज्यात अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळामुळं शेत पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि दर ठरवण्यात आले असून त्याप्रमाणेच मदत देण्यात येते. राज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, आकस्मिक आग या आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचं धोरण आहे. त्याचप्रमाणे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलीय. राज्य शासनाच्या निर्णयानुसार, अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दरानं दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारनं यापूर्वीच घेतलाय.
जानेवारी ते मे 2024 दरम्यानच्या नुकसानीची मदत : राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले होते. त्यानुसार पिकांच्या नुकसानीबाबत राज्य सरकारनं 596 कोटी 21 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती महसूल विभागाचे आवर सचिव संजीव कुडवे यांनी दिलीय. जिरायत पिकं, बागायत पिकं आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे.