अमरावती Hariyal Birds Story: हिरवा, करडा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असणारा महाराष्ट्राचा राज्यपक्षी अर्थात 'हरियाल' पक्षी (State Birds Hariyal) मेळघाटच्या जंगलासह ज्या ठिकाणी वड आणि पिंपळची मोठी झाडं आहेत त्या ठिकाणी आढळतो आहे. हरियालसह या पक्षाला हरिल, हरळी आणि हरोळी या नावानं देखील ओळखलं जातं. मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी या गावालगत वड आणि पिंपळच्या झाडावर सायंकाळी या पक्ष्यांचे थवे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
असं आहे हरियालचे वैशिष्ट्य: महाराष्ट्राचा राज्यपक्षी अशी ओळख असणारा 'हरियाल' हा वड आणि पिंपळ या वृक्षांवर अधिक प्रमाणात राहतो. हा पक्षी कधी एकटा राहात नसून या पक्ष्यांचा थवा वड आणि पिंपळाच्या झाडावर दिसतो, अशी माहिती पक्षी निरीक्षक प्रदीप हिरुळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. वड आणि पिंपळ या वृक्षांना आता वसंत ऋतूत येणारी फळं चाखण्यासाठी हे पक्षी या वृक्षांवर आढळतात. दुर्मीळ होत चाललेले हे पक्षी मेळघाटातील जंगलांसह अमरावती शहरात असणाऱ्या विदर्भ महाविद्यालय परिसर आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वडापिंपळाच्या झाडांवर आढळतात.
शिकारीमुळे झाले दुर्मीळ: हरियाल अतिशय साधा आणि सुंदर दिसणारा पक्षी आहे. अनेकदा तो पोपटासारखाच भासतो. या पक्षाची मान छाती पोट पिवळ्या रंगाचे आहे, तर पंख हिरवट राखाडी रंगाचे आहेत. या पक्षाचे पाय आणि चोच पिवळ्या रंगाची आहे. पक्षाच्या मानेवर निळ्या रंगाचा ठिपका आढळतो. हरियाल आणि पोपट-कबुतर यांचे अनेक गुणधर्म हे समानच पाहायला मिळतात. अतिशय साध्या स्वभावाच्या असणाऱ्या या पक्षाची मोठ्या प्रमाणात शिकार झाली आहे. शिकारीमुळंच हा पक्षी दुर्मीळ झाला असल्याचं प्रदीप हिरुळकर यांनी सांगितलंय.