मुंबईST Mahamandal :कोकणवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबईतील कोकणी नागरिक रेल्वेबरोबरच एसटीकडे आस लावून होते. एसटी प्रशासनाने देखील त्यांच्या अपेक्षांना खरे उतरत 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत 4300 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
गट आरक्षणात देखील सवलत मिळणार :विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, जादा गाड्यांचे आरक्षण करताना गट आरक्षण करतानासुध्दा एसटी प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, महिला यांना देय असलेली सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरक्षणामध्ये नेहमीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. व्यक्तिगत आरक्षण करताना ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत तर महिला, भगिनींना 50 टक्के सवलत तिकीट दरांमध्ये दिली जाते. त्याचप्रमाणे यंदा गट आरक्षण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तर महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 800 जास्त गाड्यांचे आरक्षण झाल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली. मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर अशा विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कोकणी बांधव मोठ्या संख्येनं वास्तव्य करतात त्या ठिकाणांहून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.