मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्रजी आणि गणितचा पेपर म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या मनात धडकी भरते. मात्र, आता गणित आणि विज्ञान या विषयाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. गणित आणि विज्ञान या विषयात पास होण्यासाठी पूर्वी 35 गुण अनिवार्य असायचे. परंतु आता गणित आणि विज्ञान या विषयात पास होण्यासाठी 35 ऐवजी 20 गुण मिळाले, तरी बोर्डाच्या परीक्षेत पास होता येणार आहे. मात्र त्यांच्या गुणपत्रिकेवर विशिष्ट शेरा असणार आहे.
सीबीएससी पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न : महाराष्ट्र बोर्डात आता सीबीएससी पॅटर्न राबवण्याचा हालचाली दिसत आहेत. कारण महाराष्ट्र बोर्डानं इयत्ता दहावीच्या परीक्षेत मोठे बदल केले आहेत. गणित आणि विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना आता 20 गुण मिळाले, तरी उत्तीर्ण होऊन त्यांना पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेता येणार. म्हणजे अकरावीत प्रवेश घेता येणार. दरम्यान, नव्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यात याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जे विद्यार्थी गणित आणि विज्ञान या विषयाबद्दल मनात भीती बाळगत होते किंवा त्यांना या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अवघड जात होतं. अशा विद्यार्थ्यांसाठी हे दोन्ही विषय आता सोप्पे जाणार असून, 20 गुण मिळवल्यानंतरही या विषयात आता पास होता येणार आहे. त्यामुळं एकीकडे या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं असून, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षणतज्ञांनी यावरून नाराजी व्यक्त केलीय.