मुंबई - नरेंद्र मोदी सरकारला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मोठा गाजावाजा करत विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला केंद्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आलंय. या अपयशानंतर आता इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर फूट पडताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेतलाय. त्यांच्या या नेतृत्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही पाठिंबा दिलाय. अशा परिस्थितीमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे सक्षम असल्याचे सांगितल्याने काँग्रेसची मोठी पंचाईत झालीय. त्यातच राज्यात समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने हा काँग्रेससाठी मोठा झटकाच म्हणावा लागेल.
काँग्रेससाठी मोठी अडचण :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएला आव्हान देण्याबरोबर तिसऱ्यांदा केंद्रातील सत्तेपासून त्यांना रोखण्यासाठी मोठा गाजावाजा करत विरोधक एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली. परंतु अल्पावधीतच या आघाडीचे प्रमुख जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत आघाडीलाच पहिला झटका दिलाय. तरीही इंडिया आघाडी हिंमत न हारता एनडीएला टक्कर देण्यासाठी सज्ज झालीय. परंतु लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यापासून इंडिया आघाडी रोखू शकली नाही आणि यानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षातच मतभेद सुरू झालेत. विशेष म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसलाय. यानंतर इंडिया आघाडीत महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसवर इतर घटक पक्षांकडून अनेक प्रश्न उठवले गेलेत. अशातच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास रस दाखवल्याने काँग्रेस अडचणीत आलीय. परंतु नेतृत्व करणे ही प्रत्येकाची इच्छा असल्याचे सांगत या फक्त चर्चा असल्याचं राज्यातील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
राम कदम, विजय वडेट्टीवार आणि अबू आझमी यांची प्रतिक्रिया (Source : ETV Bharat Reporter) अखिलेश यादवांचा ममतांना पाठिंबा : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मशिदीसंबंधी केलेल्या पोस्टमुळे राज्यात समाजवादी पक्ष नाराज झाला असून, त्यांनी वेगळी भूमिका घेतलीय. शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातला असताना समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी विरोधकांना न जुमानता शपथ घेतली. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडेसुद्धा महाविकास आघाडीने जास्त लक्ष दिले नसल्याने यापूर्वीच ते काँग्रेसवर नाराज होते. या कारणाने समाजवादी पक्ष राज्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत की, समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्याशी याबाबत बोलणं झाले नसून मी त्यांना भेटण्याची वाट पाहत आहे. परंतु दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार रईस शेख यांनी मात्र धर्मनिरपक्षतेबाबत महाविकास आघाडीची काय भूमिका आहे? हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावं, असं ठामपणे सांगितलंय. एकीकडे राज्यात असे प्रकार घडत असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेल्या दाव्याचे समर्थन केलंय. या कारणाने आता समाजवादी पक्षसुद्धा काँग्रेसवर नाराज असल्याचं दिसून येतंय.
काँग्रेस देशातून संपून जाणार :जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीसुद्धा ममता बॅनर्जी यांच्या नावाला पाठिंबा दिलाय. इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे सक्षम असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीच्या या सर्व घडामोडींवर बोलताना भाजपा नेते आणि आमदार राम कदम म्हणाले आहेत की, ज्या उद्देशाने इंडिया आघाडी स्थापित झाली होती. तो उद्देश कधीच सफल होणारा नव्हता. इंडिया आघाडी पूर्णतः खिळखिळी झालीय. काँग्रेस देशात सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असून, हे आता त्यांच्या सहयोगी पक्षांना समजू लागलं आहे. ज्या नितीश कुमारांनी इंडिया आघाडी बनविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली तेच इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर इंडिया आघाडीच अस्तित्व तेव्हा संपलं होतं. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर लोटण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांना कुठेही यश आलं नाही. आता इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करावं? हा त्यांचा प्रश्न असला तरी, येणाऱ्या काळात काँग्रेस देशातून संपून जाईल, हे नक्की, असंही राम कदम म्हणालेत.
हेही वाचा-
- "विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय..."; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
- समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्यासारखं वागत आहे- आदित्य ठाकरे