मुंबई Malegaon Bomb Blast Case : भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागच्या वेळेला न्यायालयानं ताकीद देऊन सुद्धा या वेळेला सुनावणीला मालेगाव बॉम्बस्फोटामधील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या गैरहजर राहिल्या. त्यामुळे दहा हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट विशेष NIA न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या न्यायालयानं बजावलं आहे. ही रक्कम भरेपर्यंत कारवाईची टांगती तलवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कायम आहे.
जबाब नोंदणीसाठी सतत गैरहजर :मालेगाव बॉम्बस्फोटामधील मुख्य आरोपी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मागच्या वेळेला न्यायालयानं हजर राहण्याबाबत बजावलेलं होतं. "तुम्हाला नियमित फौजदारी प्रक्रिया संहिता 313 च्या नुसार जबाब नोंदणी करता हजर राहावं लागेल. जर हजर नाही झाले, तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे," असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. "या वेळेला तब्येतीच्या कारणामुळं आरोपी गैरहजर आहे," असं वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं. मात्र न्यायालयाचं त्यावर समाधान झालं नाही. त्यांनी आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना दहा हजार रुपयाचं जामीनपात्र वॉरंट बजावलेलं आहे.