अमरावती Independence Day Invitation : दारूबंदी ते कृषी क्रांती असा प्रवास करणाऱ्या ममता ठाकूर (Mamta Thakur) यांच्या कर्तृत्वाची दखल थेट केंद्र शासनानं घेतली. आता स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. एका छोट्याशा गावातील महिला स्वातंत्र्यदिन सोहळ्यात दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचा अभिमान संपूर्ण गावानं व्यक्त केलाय. पती प्रमोद ठाकूर यांच्यासह ममता ठाकूर या बुधवारी सकाळी विमानानं दिल्लीकडे रवाना झाल्या. ममता ठाकूर यांच्या या यशस्वी प्रवासासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
विविध पुरस्कारांनी सन्मानित : केवळ चूल आणि मूल या पलीकडं दुसरं काहीही नाही, अशी अनेक वर्ष अवस्था असणाऱ्या ममता ठाकूर यांना घराबाहेर पडण्याची प्रेरणा कुटुंबीयांनी दिली. या प्रेरणेतूनच ममता यांनी गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. घरातील शेतीचा कारभार देखील त्यांनी हाती घेतला. कमी खर्चात त्या शेतात दर्जेदार पीक घेत असून त्यांच्या शेतातील तूरडाळ थेट मुंबईत पोहोचली. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना सशक्त बनवण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. राज्य शासनाकडून विविध पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलंय.
स्वातंत्र्य दिन समारंभात विशेष अतिथी म्हणून मान : कृषी क्षेत्रातील योगदान आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी ममता ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नाची दखल, केंद्र शासनाच्या वतीनं घेतली आहे. त्यांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं. दिल्लीत थ्री स्टार हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. "माझ्यासारख्या साध्या महिलेची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणं ही खरोखरच माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे," असं ममता ठाकूर म्हणाल्या.
महिलांना दाखवली प्रगतीची वाट : कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ममता ठाकूर यांना 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा खास लाभ मिळाला. या योजनेमुळं शेतीसाठी खास 'दशपर्णी' तयार करुन त्या शेतात अतिशय उच्च दर्जाची तूर, मिरची, धणे, गहू, ज्वारी अशा पिकांचं उत्पन्न घेतात. यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक औषधाचा वापर केला नाही. तर स्वतः घरी बनवलेलं 'दशपर्णी' अर्क त्यांनी शेतात वापरला. यासोबतच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शिलाई कामाचं प्रशिक्षण दिलं. शेतरुपा बचत गटाच्या माध्यमातून ममता ठाकूर यांनी आपल्यासह गावातील अनेक महिलांना प्रगतीची वाट दाखवली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं त्यांना 'हिरकणी' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
कृषी विज्ञान केंद्रानं बदलली दृष्टी : आपल्या घराशिवाय बाहेरचं जग अजिबात ठाऊक नसताना घातखेड इथल्या संत ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विषय विशेषतज्ज्ञ डॉ. प्रणिता यांच्याकडून 2007-08 पासून गावातील महिलांना कृषी क्षेत्रात योगदान देण्यासंदर्भात प्रेरणादायी कार्यक्रम राबवण्यात आले. या माध्यमातून गावातील अनेक महिला एकत्र आल्या. महिलांनी घातखेड इथल्या संत ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. ही भेट त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणारी ठरली.