वाशिम : जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन (Soybean) खरेदी सुरू होती. मात्र बारदानं संपल्यानं सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आली आहे. पणन विभागाच्या दुर्लक्षाने उद्भवलेल्या या समस्येमुळं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. बारदानांचा तुडवडा असल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा झाला आहे. तयामुळे बारदानं (पोती) कधी उपलब्ध होणार, याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे.
केंद्रावरील बारदानं संपली : वाशिम तालुक्यातील नाफेडच्या राजगाव खरेदी केंद्रावर संत गजानन महाराज नाविण्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, उमरा कापसे या संस्थेमार्फत सोयाबीनची हमीभावानुसार खरेदी प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी ६ हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. तर २ हजार ५०० शेतकऱ्यांना आतापर्यंत मेसेज देखील देण्यात आला होता. अपेक्षित १ लाख क्विंटल सोयाबीनच्या तुलनेत २४ हजार क्विंटल सोयाबीनची हमीभावानुसार खरेदी करण्यात आली. मात्र गत काही दिवसापासून केंद्रावरील बारदानं संपली असून पणन विभागाने ही बारदानं उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र, याकडं दुर्लक्ष करण्यात आल्यानं सोयाबीनची खरेदी थांबवण्यात आली आहे.
बारदानं कधी उपलब्ध होणार : नाफेड अंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात होती. परंतु ऐनवेळी बारदानं संपल्यामुळे सोयाबीनची खरेदी थांबली आहे. आता बारदानं कधी उपलब्ध होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.