सोलापूर :वाद-विवादामुळं माणसाला नातं फार काळ टिकवता येत नाही. बोलता येत असतानासुद्धा नातं टिकवायला तो अपयशी ठरतो. मात्र, शेतकरी राजा आणि बैल यांचं अतूट नातं आपण आज पाहणार आहोत. माणसाला काही दुर्धर आजार झाला की कुटुंबातील सदस्य त्याला दूर करतात, घरातून बाहेर काढतात. मात्र, सोलापुरातील एका शेतकऱ्यानं आपल्या आंधळ्या बैलासोबतचं नातं तब्बल 16 वर्षापासून टिकवलंय, त्याचा सांभाळा केलाय.
दुर्धर आजारानं डोळे गेले : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एका अंध बैलानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलंय. इंद्रसेन मोटे (रा. वाळूज, ता. मोहोळ, जि.सोलापूर) या शेतकऱ्याकडं मागील सोळा वर्षांपासून आंधळा बैल आहे. अंध बैल 'सोन्या'नं शेतकऱ्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. "लहानपणी या बैलाच्या डोळ्याला दुर्धर आजार झाला होता. डॉक्टरांकडं त्याला दाखवलं असता, डॉक्टरांनी त्याला तपासून डोळ्याला गंभीर आजार झाला असल्याची माहिती दिली. हळूहळू हा बैल आंधळा होईल, दुसऱ्या डोळ्याला देखील आजार होऊन हा बैल दोन्ही डोळ्यांनी आंधळा होईल, अशी माहिती दिली होती. कालांतरानं तसं झालंही," असं शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी सांगितलं.
न विकता बैलाचा केला सांभाळ : गावातील काही ग्रामस्थांनी बैलाला विकण्याचा सल्ला दिला होता. सोन्याच्या डोळ्याला दुर्धर आजार आहे, तो बरा होणार नाही, असं सांगितलं होतं. तो बैल कत्तलखान्याला विकून दुसरा बैल किंवा वासरू घ्या, असा सल्लाही दिला होता. परंतु, या शेतकऱ्यानं बैलाला न विकता त्याचा सांभाळ केला. मागील सोळा ते सतरा वर्षांपासून हा बैल शेतात राबत आहे आणि शेतकऱ्याचं पांग फेडत आहे.