तरुणीच्या हत्येप्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड (पुणे) Oyo Girl Murder Case : हिंजवडी परिसरातील एका Oyo हॉटेलमध्ये शनिवारी (28 जानेवारी एका प्रियकरानं आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. वंदना (वय २६, मूळ रा. उत्तर प्रदेश) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर, प्रियकराचं नाव ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असं आहे. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे.
आरोपीला केली अटक : सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील महारुंजी भागातील ओयो लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्यानं खळबळ उडाली होती. पियकरानं ही हत्या केल्याचं उघड झालं होतं व हे दोघेही लखनौचे रहिवासी आहेत. या हत्येनंतर आरोपी प्रियकर लखनौला जाण्यासाठी पळून गेला. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत पिस्टलसह ताब्यात घेतलं व नंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली'.
प्रेयसी वेळ देत नसल्यानं चारित्र्यावर संशय : ऋषभ आणि वंदना हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत. दोघे एकाच परिसरात राहत असून, शाळेपासून दोघांची मैत्री होती. त्यामुळं त्यांची जुनी ओळख होती. जुनी मैत्री ही प्रेम संबंधात बदलली. त्यातूनच मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, पुढे वंदनानं इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला आणि आपलं शिक्षण पूर्ण करून वंदना काही काळापूर्वीच नोकरीच्या निमित्तानं पुण्यात आली होती. तिथे ती एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. वृषभ हा लखनौ येथे ब्रोकर म्हणून छोटे-मोठे काम करत होता. दरम्यान, वृषभला असं वाटत होतं की, वंदना पुण्यात गेल्यापासून आपल्याला वेळ देत नाही. दोघांमध्ये हळूहळू बोलणं कमी होत गेलं. यावरून वृषभला असं वाटत होतं की वंदनाचं इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध जुळले आहेत. वृषभ वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळंच त्यानं प्रेयसीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
लॉजवर भेटायला बोलावलं आणि केला हत्या : 25 जानेवारीला ऋषभ लखनौवरून पुण्यात आला. त्यानंतर तो हिंजवडीतील 'ओयो'मधील एका खोलीत थांबला. वंदना 26 जानेवारीच्या सायंकाळी लॉजवर भेटायला आली; परंतु ती त्यादिवशी मुक्कामी थांबली नाही. दुसऱ्या दिवशी ऋषभनं वंदनाला पुन्हा बोलावून घेतलं. त्यानंतर ते दोघेही खरेदीसाठी बाहेर जाऊन आले, सोबत जेवणही केलं. 27 जानेवारीच्या रात्री वृषभनं पुन्हा वंदनाला भेटायला लॉजवर बोलवलं होतं. वंदना आणि वृषभ यांच्यात काही कारणावरून तिथं वाद सुरू झाला. दरम्यान, साडे नऊच्या सुमारास त्यानं वंदनाची निर्घृण हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात ती लॉजच्या खोलीत पडली होती.
आरोपी आणि मृत मुलगी हे दोघेही मागील अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत. मृत मुलगी ही हिंजवडीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कामाला आहे. प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकरानं तिच्यावर बंदूकीनं गोळ्या झाडून हत्या केली. आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे - सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस
पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांकडून अटक : 27 जानेवारीला रात्री दहा वाजता ऋषभ मृतदेह तसाच खोलीमध्ये सोडून हॉटेलच्या बाहेर पडला. बाहेर पडत असताना ऋषभ हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. त्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेनं निघून गेला. मुंबईच्या नाकेबंदीत पोलिसांना ऋषभच्या शारीरिक हालचाली पाहता, त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याचं साहित्य तपासलं असता बॅगेत बंदूक आढळली आणि ऋषभचं बिंग फुटलं. त्यानंतर लगेच मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना हत्या संदर्भात माहिती देत आरोपीला अटक केली. मुंबई पोलिसांनी आरोपी ऋषभ याला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केलंय. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकर ऋषभ निगमनं त्याची आयटी इंजिनियर प्रेयसी वंदनाची निर्घृण हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय.
हेही वाचा:
- 'माकडाच्या हाती कोलित दिलं'; पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या निवडीवर विरोधक पडले तुटून
- मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरुन ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता; छगन भुजबळांनी केला 'हा' मोठा दावा
- "हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड", राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा हल्लाबोल