नाशिक Snake Spotted inside Train :जबलपूर मुंबई गरीब रथ या एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या एसी डब्यात 5 फूट लांब साप निघाल्यानं मोठी खळबळ उडाली. नाशिकजवळील कसारा घाटात हा साप प्रवाशांना दिसून आला. त्यामुळे प्रवाशांना मोठा हादरा बसला. प्रवाशांनी तत्काळ ही घटना रेल्वेच्या जबलपूर इथल्या अधिकाऱ्यांना कळवली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दुसऱ्या डब्यात शिफ्ट करण्यात आलं. रेल्वेच्या एसी डब्यात साप निघाल्याचा हा व्हिडिओ आता सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान गरीब रथ एक्सप्रेसमध्ये निघालेला साप धामण असल्याचं जाणकारांनी यावेळी सांगितलं.
रेल्वेच्या एसी डब्यात लटकलेला दिसला साप :जबलपूरहून मुंबईला येणारी जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेस जबलपूरहून कसारा घाटात पोहोचली. यावेळी कसारा स्थानकावर रेल्वेच्या एसी डब्यात साप लटकलेला दिसल्यानं प्रवाशांना चांगलाच हादरा बसला. रेल्वेच्या सीटखाली साप लपून बसल्याचं प्रवाशांनी सांगत मोठा गदारोळ केला. यावेळी एका प्रवाशाला साप दिसल्यावर त्यानं इतर प्रवाशांना याबाबतची माहिती दिली. रेल्वेच्या एसी डब्यात निघालेला हा साप सुमारे 5 फूट लांब असून धामण असल्याची प्राथमिक माहिती प्रवाशांनी दिली.
अरे बाप रे बाप, रेल्वेच्या एसी बोगीत निघाला साप; प्रवाशांची हादरुन तारांबळ, दुसऱ्या डब्यात केलं शिफ्ट (ETV Bharat) रेल्वेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना झालं नाही सापाचं दर्शन :जबलपूर मुंबई गरीब रथ या एक्सप्रेसमध्ये साप असल्यानं प्रवाशांनी मोठा गदारोळ केला. यावेळी काही प्रवाशांनी जबलपूर इथल्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यासह 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी विश्वजीत सिंह यांना या घटनेची माहिती दिली. त्यांमुळे त्यांनीही रेल्वे विभागाकडून याबाबतची माहिती घेतली. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही वेळ रेल्वे थांबवून संपूर्ण डबा तपासला. मात्र डब्यात काहीच आढळून आलं नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात आलं आहे.
रेल्वे विभाग करणार या घटनेची चौकशी :जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमध्य साप आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेची रेल्वे विभाग चौकशी करणार आहे. रेल्वे विभाग प्रवाशांच्या सुरक्षेला जास्त महत्त्व देते. त्यामुळे रेल्वेची तपासणी आणि डब्यांची साफसफाई केल्यानंतरही रेल्वेत साप कसा आढळून आला,याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हर्षित श्रीवास्तव यांनी दिली.