नाशिक Coriander Rs 450 per Judi : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तसंच पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा असल्याने बाजारात कोथिंबीर पाठोपाठ मेथीची आवक देखील कमी झाली आहे. परिणामी नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणि मेथीने उच्चांकी भाव गाठला. कोथिंबीर 450 तर मेथी चक्क 250 रुपये जुडी प्रमाणे विकली गेली. विक्रीला आणलेल्या कोथिंबीर आणि मेथीला रेकॉर्ड ब्रेक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळालं.
ऐतिहासिक विक्रमी भाव -नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतातील उभं पीक खराब झालं आहे. त्यातच बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या असल्याने बाजारात केवळ पंधरा टक्के शेतीमाल आला परिणामी कोथिंबीर आणि मेथीला ऐतिहासिक विक्रमी भाव मिळाला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी लिलावात चांदवड तालुक्यातील शिंदेगाव येथील शेतकरी भिका ठोंबरे यांच्या कोथिंबीरला 45 हजार शेकडा तर सिन्नर तालुक्यातील जातील गावातील शेतकरी मच्छिंद्र शेळके यांच्या मेथीला 24 हजार शेकडा असा विक्रमी भाव मिळाला.
कोथिंबीर जुडी कमाल 450 -शेतकऱ्यांना मिळालेले भाव पाहता, कोथिंबीर साडेचारशे रुपये जुडी तर मेथी 240 रुपये जुडी असा भाव मिळाला. दहा दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये कोथंबीरला 250 रुपये जुडी इतका भाव मिळाला होता. यापूर्वी कोथिंबीरला 15 दिवसांपूर्वी अडीचशे रुपये भाव मिळाला होता. सध्या बाजारात कोथिंबीर जुडी कमाल 450 तर किमान 120 रुपये जुडी दराने विक्री होत आहे. तर मेथी जुडी कमाल 250 तर किमान 70 रुपये दराने विक्री होत आहे.
हा दिवस कधीही विसरू शकणार नाही - "मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून शेती व्यवसाय करतो आणि नाशिक बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी घेऊन येतो. मात्र आज माझ्या कोथिंबीरीला पहिल्यांदाच इतका विक्रमी भाव मिळाला, याचा मला आनंद आहे. आम्ही सर्व कुटुंब रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतात पीक घेत असतो. आज खऱ्या अर्थाने आमच्या कष्टाचं चीज झाल आहे. त्यामुळे आजचा बैलपोळा आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही," असं कोथिंबीर उत्पादक शेतकरी भिका ठोंबरे यांनी सांगितलं.