महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यासहीत सहा जण तडीपार; नेमकं प्रकरण काय? - MANOJ JARANGE PATIL

वाळू तस्करी प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून तडीपार केलंय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याचाही यात समावेश आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2025, 8:07 PM IST

जालना-वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन सक्रिय झाले असून, वाळू तस्करी प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आलंय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावरदेखील तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर अशी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई :मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई झालीय. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आलीय. मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आलीय. सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.

कोण आहे विलास खेडकर? : विलास हरिभाऊ खेडकर हा मनोज जरांगे यांचा मेहुणा आहे. जालना, बीड, आणि परभणी जिल्ह्यांतून याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलंय. 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तसेच 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून केणीच्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे विलास खेडकर याला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details