मुंबई Shyam Manav On Ajit Pawar :अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी मोठा आरोप केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र तथा तत्कालिन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, असं अजित पवार यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगितलं होतं, असा दावा त्यांनी केला. परंतु अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिला आणि सही न करता ते 13 महिने कारागृहात राहिले, असा दावाही श्याम मानव यांनी केला आहे. श्याम मानव यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
'ठाकरे कुटुंबीयांना अडकवण्याचा डाव (Reporter) ठाकरे कुटुंबाला अडकवण्याचा डाव :याप्रसंगी बोलताना श्याम मानव म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे सुद्धा कॅबिनेट मंत्री होते. या ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अजित पवार यांच्याकडून दबाव होता. राज्याच्या गृहमंत्र्यांकडं निरोप जातो की, मी तुमच्याकडं चार प्रतिज्ञापत्र पाठवले आहेत. त्यावर सही करा, तर तुम्ही ईडीच्या कारवाईपासून वाचाल. जर तुम्ही या प्रतिज्ञा पत्रावर सही केली नाही, तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा निरोपही अनिल देशमुख यांना देण्यात आला."
उपमुख्यमंत्री अजित पवार (Reporter) कुठली होती ती चार प्रतिज्ञापत्र ? :पहिलं प्रतिज्ञापत्र असं आहे की, "तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिलं, त्यावर सही करा. दुसरं प्रतिज्ञापत्र असं आहे की, उद्धव ठाकरेंचा यांचा मुलगा आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री यांनी दिशा सालीयान या मुलीवर अत्याचार केला. तिचा खून केला, यावर सही करा. तिसरं प्रतिज्ञापत्र असं आहे की, अनिल परब यांचे गैरव्यवहार आहेत, या प्रकरणावर सही करा. चौथं प्रतिज्ञापत्र असं आहे की, गुटखा विक्रेते यांच्याकडूनही वसुली करण्याचं टार्गेट दिलं गेलं, यावर सही करा. परंतु देशमुख यांनी फार विचार केला, त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी सही दिली नाही आणि ते 13 महिने जेलमध्ये राहिले. अखेर कोर्टानं त्यांना क्लीन चीट दिली. म्हणून अनिल देशमुख यांचं अभिनंदन करावसं वाटतं, कारण ते ताठ मानेनं सामोरं गेले, पण झुकले नाहीत," असंही शाम मानव म्हणाले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार, संजय राऊत यांच्यावरही ईडीची कारवाई करण्यात आली. पण त्यातून काय सिद्ध झालं? असा प्रश्नही शाम मानव यांनी केला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Reporter) श्याम मानव यांनी सांगितली वस्तुस्थिती :श्याम मानव यांनी मांडलेले मुद्दे खरे असल्याचं तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की,"अनिल देशमुख जिंदगीभर जेल मे जायेगा, पर किसी पर झुठा आरोप करेगा नही." श्याम मानव यांनी जे काही सांगितलं आहे, ते पूर्णतः खरं आहे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र द्या. त्यांनी ते लिहून आणलं होतं. हे आरोप त्यांच्यावर करा, असं सांगितलं होतं. माझ्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला. परंतु मी अखेरपर्यंत झुकलो नाही. मी चौकशीला सामोरं गेलो. अखेर एक ना एक दिवस सत्याचा विजय होतोच," असंही अनिल देशमुख म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला होता खास माणूस :श्याम मानव यांनी काल केलेला दावा अगदी सत्य असल्याचं माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय. "सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडं एका व्यक्तीला पाठवलं होते. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अफिडेव्हीटवर सही करण्यास सांगितलं होते, असा पुनरुच्चार अनिल देशमुख यांनी केला. अफिडेव्हीटवर सही केल्यास तुमच्या मागं ईडी आणि सीबीआय लागणार नाही, असं प्रलोभन दिलं होतं. पण दबावाला बळी न पडता जेलमध्ये जाणं पसंत केल्याचं देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत. तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसानं मला 3 वर्षांपूर्वी ऑफर दिली होती. माझ्या शासकीय निवासस्थानी ही ऑफर मला देण्यात आली होती," असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.
मी फडणवीसांचं ऐकलं नाही म्हणून :देवेंद्र फडणवीस यांचं ऐकलं नाही, म्हणूनचं माझ्या मागं ईडी लावून मला तुरुंगात टाकलं, असं देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनवर अत्यात्कार केला, त्यानंतर बाल्कनीतून ढकलून दिलं, असा आरोप करण्यासही सांगण्यात आलं होतं. मी तोही आरोप केलेला नाही, असं ते म्हणाले. ऑफर मला देण्यात आली, त्या संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडं असून मी योग्य वेळी ते समोर आणेन, असं अनिल देशमुख म्हणाले.
हेही वाचा :
- अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी मध्यरात्री दिल्ली का गाठली?; भेटीमागचं नेमकं कारण काय? - AJIT PAWAR AMIT SHAH VISIT
- अजित पवारांची मोठी घोषणा; विधानसभा महायुतीबरोबर तर स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार - Ajit Pawar Vidhan Sabha Election