छत्रपती संभाजीनगर Grishneshwar Temple : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या सोमवारी (Shravan Somvar 2024) सर्वच शिव मंदिरात भक्तांची गर्दी होते. १२ ज्योतिर्लिंग यात्रेत महत्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेल्या 'घृष्णेश्वर' मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायास मिळाली. मंदिर विश्वस्तांनी भाविकांसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर अवजड वाहनांची वाहतूक ही रहदारीपासून अन्य मार्गानं वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवसाला पावणारे देवस्थान : श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात. भगवान शंकराचे देशभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं वेगवेगळं वैशिष्ठ पाहायास मिळते. आधी या मंदिराचे नाव 'कुमकुमेश्वर' असं होतं. तर शिवालय म्हणजे शिवाचे घर अशी मान्यता आहे. 'घृष्णा' नावाच्या महिलेच्या नावावर 'घृष्णेश्वर' असं नाव पडल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. सर्व मंदिराची परिक्रमा पूर्ण करताना शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ येथील 'घृष्णेश्वर मंदिर'. हे मंदिर अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. इतर ज्योतिर्लिंग मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण होत नाहीत, मात्र या मंदिरात पूर्ण परिक्रमा घेता येतात. पहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत, तर घृष्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख आहे.
भाविकांसाठी मंदिर खुलं : देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाहीत, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळं देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येतो. तर दरवर्षी श्रावणात मोठ्या संख्येने भक्त घृष्णेश्वर मंदिरात येतात. रोज सकाळी ५ वाजता भाविकांसाठी मंदिर खुलं होतं. मात्र, श्रावणात रात्री बारापासूनच मंदिरात प्रवेश दिला जातो. रात्री 12 ते पहाटे 5 आणि दुपारी 12 आणि रात्री 8 वाजता महादेवाची आरती केली जाते.