नागपूर 14 Baby Cobra Snakes Found in Nagpur :पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं अनेक ठिकाणी सापांचं दर्शन होत आहे. अशातच नागपुरच्या हिंगणा येथील अमर नगरातील एकाच घरात एक दोन नव्हे तर तब्बल 14 विषारी नाग निघाल्याची घटना घडली आहे. या 14 नागांच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. दिलीप यादव यांच्या घरी हे सर्व नागाचे पिल्ले आढळून आले आहेत.
सर्पमित्रांनी सापांना सोडलं जंगलात : दुपारच्या वेळेत शहरातील हिंगणा परिसरातील दिलीप यादव यांना घरात हे सर्व नागाचे पिल्ले दिसून आले. नागाची पिल्लं दिसताच त्यांनी तात्काळ याची माहिती शेजारच्यांना दिली. एकाच वेळी 14 नाग दिसून आल्यानं दिलीप यादव यांच्यासह घरातील सर्व सदस्य व शेजारी देखील घाबरलेले होते. यासंदर्भातील माहिती विदर्भ सर्पमित्र समितीच्या आकाश मेश्राम, विकास मेश्राम, आदित्य बाळबुदे यांना कळवण्यात आली. यानंतर सुमारे तीन ते चार तास नागांच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यासाठी कालावधी लागला. यादरम्यान शोधमोहिमेत नाग जातीचे 14 विषारी पिल्ले पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. पिल्यांची संख्या जास्त असु शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आलं आहे. सर्पमित्र यांनी या सापांना पकडून जंगल परिसर सोडून दिलं. त्यानंतरचं सर्वांचा जीव भांड्यात पडला.