सातारा : "छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले", असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी केला होता. या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. मात्र, त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. तर याप्रकरणी आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
नेमकं काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले? : या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, "राहुल सोलापूरकरांनी कोणत्या हेतूनं वक्तव्य केलं, त्याच्या खोलात सरकारनं गेलं पाहिजे. या माध्यमातून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा डाव आहे का? हेही सरकारनं तपासलं पाहिजे. वादग्रस्त बोलायचं आणि राज्य अशांत करायचं, हा खेळ चाललेला आहे, असं मला तरी वाटतं," असा संशय शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलाय.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) सरकारनं ताबडतोब कडक कारवाई करावी : पुढं ते म्हणाले, "कलाकार असल्यानं आम्हाला समजातलं सगळं कळतं, असं त्यांना वाटतं. तुम्हाला जर सगळं कळत असतं तर तुम्ही छत्रपतींच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं आणि इतिहासाबद्दल एवढ्या बिनधास्तपणे बोलला नसता", असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसंच सोलापूरकरांनी माफी मागितली असली तरी त्याचा काही उपयोग नाही. सरकारनं त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी, अशी मागणीही शिवेंद्रराजेंनी केलीय.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला अद्दल घडवा : "जो इतिहास आपण वाचलाय. त्यात छत्रपतींनी लाच देऊन आग्र्याहून सुटका करून घेतल्याचं लिखाण नाही. छत्रपतींचा मुत्सद्दीपणा दाखवण्याचंच काम इतिहासकारांनी केलय. त्यामुळं सोलापूरकरांच्या वक्तव्यानं शिवप्रेमींच्या भावन दुखावल्या आहेत. महापुरुषांबद्दल अशा पद्धतीनं पुन्हा कोणी वक्तव्य करू नये, अशी कडक कारवाई करून सरकारनं उदाहरण समोर ठेवल्याशिवाय असे लोकं सुधारणार नाहीत," असं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय.
हेही वाचा -
- अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार? पाहा काय म्हणाले पुणे पोलीस आयुक्त
- अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा दिला राजीनामा
- “जीभ हासडली पाहिजे आणि गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावर उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया