पुणेShirur Lok Sabha :शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोठा दावा केलाय. शिरूरच्या उमेदवारीबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी काम थांबवू नका, असं मला सांगितलं आहे. पण, पक्ष जो उमेदवार देईल त्यांचं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी शिवसैनिक आहे. मला धनुष्यबाण घेऊन लढायचं आहे. शिरूरमधून सुनेत्रा पवार, वळसे पाटील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहतील, असं मला वाटत नाही." असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री म्हणतील तसं काम करणार : शिरूरच्या उमेदवारीबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "तुम्हाला वाटतं तसं नाही. मला लोकसभा मिळाली नाही तरी, मी तिकीटासाठी कधीच फिरत नाही. मी माझा बहुतांश वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात लोकांच्या समस्या सोडवण्यात घालवला. आज म्हाडाची अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
- मीच उमेदवार असणार :"शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मीच उमेदवार असणार, अशी मला खात्री आहे. पण मुख्यमंत्री तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांनी महायुती उमेदवार दुसरा ठरवला, तर त्याचाही प्रचार करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची माझी भूमिका आहे," असे आढळराव पाटील म्हणाले.