नाशिक Shiv Jayanti 2024 :आगामीशिवजन्मोत्सवानिमित्त नाशिकमध्ये छत्रपती सेनेतर्फे सुवर्ण होनची पितळी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचा व्यास 8 फूट असून तिचं वजन 140 किलो आहे. बाळकृष्ण संगमनेरकर यांच्यासह पाच कारागीर गेल्या 20 दिवसांपासून हा होन घडवण्याचं काम करतायेत. या होनच्या रूपानं छत्रपती सेना सलग सातव्या वर्षी 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये विश्वविक्रम नोंदवण्याच्या तयारीत आहे. हा सुवर्ण होन शहरवासीयांना 17 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात पाहता येईल.
केवळ तीन सुवर्ण होन अस्तित्वात : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी सुवर्ण होन हे चलन सुरू करण्यात आलं होतं. आज केवळ तीन सुवर्ण होन अस्तित्वात आहेत. एक होन दिल्ली येथील संग्रहालयात, दुसरा ब्रिटनमधील संग्रहालयात तर तिसरा होन मुंबईत गिरीश शहा आणि जगदीश विरा यांच्या संग्रहात आहे. त्या होनची भव्य प्रतिकृती प्रत्यक्षात पाहण्याची संधी छत्रपती सेनेनं शिवप्रेमींना उपलब्ध करून दिलीय. 17 फेब्रुवारीपासून जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे ही होन प्रतिकृती पाहता येईल.
गेल्या वर्षी कवड्याची माळ तयार केली : शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती सेनेनं मागील वर्षी 21 फूट लांब आणि 71 किलो वजनाची 64 कवड्यांची माळ तयार केली होती. यासाठी बडोदा येथे प्रत्येकी एक फूट उंचीच्या कवडी तयार केल्या गेल्या. नाशिक मध्ये कवड्यांना कोटिंग आणि कलरिंग केलं गेलं. आठ कारागिरांनी दीड महिन्यात ही भव्य माळ घडवली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य जिरेटोप, भवानी तलवार, वाघनखं, कट्यार अशा वस्तूही साकारण्यात आल्या होत्या, ज्याची नोंद विश्वविक्रमात झाली आहे.
महिलांसाठी खास स्पर्धा : यंदा सर्व वयोगटातील महिलांसाठी महिला योध्दांशी निगडित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय नऊवारी वेशभूषा स्पर्धा होणार असून विजेत्यांना सोन्याची नथ बक्षिस म्हणून दिली जाईल.
हे वाचलंत का :
- परवानगी द्या, शिवजयंतीपासून आम्ही शिवप्रेमी स्मारकाचं काम हाती घेऊ- विनोद पाटील यांची मागणी
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी संदीप सिंग सज्ज
- छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी 2 लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद