मुंबई Action against Narayan Rane:लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे; मात्र मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा तिढा आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जुंपली असताना, आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून देखील वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण येथे भाजपाचे विजयी खासदार नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत आणि चुकीचा प्रचार करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळं त्यांची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाकडून) करण्यात आली आहे.
प्रचारादरम्यान, पैसे वाटल्याचा आरोप :लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या प्रचारावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार संपलेला असतानासुद्धा ईव्हीएम मशीन दाखवून नारायण राणेंना मतं द्या असं आवाहन करण्यात आलं. तसंच प्रचारादरम्यान मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत, असं नोटिसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं नारायण राणे यांची खासदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढविण्यास तसंच मतदान करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही कायदेशीर नोटिस शिवसेना (ठाकरे) पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला वकील असीम सरोदे, अॅड. किशोर वरक आणि अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत पाठवलेली आहे.