नागपूर Lok Sabha Election 2024 :रत्नागिरी -सिंधुदुर्ग जागेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू असलेली वाटाघाटी पूर्ण झालेली असून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी "रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा दावा अद्याप आम्ही सोडला नाही," असं स्पष्टीकरण दिलंय. "किरण सामंत यांनी भावनिक होऊन तो निर्णय घेतला होता, परंतु अजून शिवसेनेचा दावा कायम आहे. या संदर्भात उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेतला जाईल," असं देखील ते म्हणालेत.
भावनेच्या भरात किरण सावंत यांची पोस्ट :लोकसभेच्या जागांची वाटाघाटी करत असताना आमचे नेते एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये, या भावनेतून किरण सावंत यांनी पोस्ट केली, असं उदय सामंत म्हणाले. विदर्भात महायुतीचे सर्व दहा उमेदवार निवडून येतील. शिवाय राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे, असंही ते म्हणाले आहेत.
रश्मी बर्वे यांच्याविरोधात काँग्रेसचं षडयंत्र :"मी रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला, तेव्हा एक लक्षात आलं की काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांच्या विरोधात जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात आलं," असा आरोप त्यांनी केला. "जेव्हा काँग्रेस नेत्यांना हे माहीत होतं की रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अडचणीचं ठरणार आहे, तेव्हा महिला भगिणीला उभं करनं हे काँग्रेसचं षडयंत्र होतं. आपला उमेदवार रद्द होणार आहे, माहीत असताना काँग्रेसनं उमेदवारी दिली. आता महिलेची बदनामी करत खापर महायुतीवर फोडत आहेत," असा आरोप उदय सामंत यांनी केला. "काँग्रेसनं पर्यायी एबी फॉर्म तयार केला होता, म्हणजे याची त्यांना निकालाची जाणीव होती. राजू पारवे हे लोकसभेत जातील यामध्ये शंका नाही."