छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं संभाजीनगरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आपल्या भाषणात मी पुन्हा येईल, असं म्हणत विरोधकांना इशारा दिला. आता अडीच वर्ष वाट पाहावी लागेल, त्यानंतर जर मंत्रिपद मिळालं नाही, तर लोकांच्या मागणीचा विचार करू. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो पर्यंत माझ्यावर विश्वास आहे तो पर्यंत मी कुठंही जाणारं नाही, असं आमदार सत्तार यांनी सांगत सूचक वक्तव्य केलं. सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे जंगी कार्यक्रम घेत त्यांनी मंत्रिपदासाठी स्वतःच्या पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना मात्र उधाण आलं. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर देत धमकी वजा इशाराही दिला.
स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांना इशारा :नव्यानं मंत्री झालेले संजय शिरसाट यांनी शहरांमध्ये पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढू, असं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सिल्लोडमधील देखील गुंडगिरी चालू देणार नाही, अशी टीका अप्रत्यक्षरित्या आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर केली. यावर आता जाहीर भाषणात अब्दुल सत्तार यांनी संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं. "अनेक लोकांना सिल्लोड मतदार संघाची खूप आठवण येत आहे. गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना, मी आता थेट संभाजीनगरमध्ये आलोय," असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला. तर अनेक वेळा त्यांच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यावर देखील, सिल्लोडकडं पाहणारा एक जण आता घरी बसलाय, असा टोला लगावला. तर "माझा जाहीर सत्कार होत असताना अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र, जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी कुठंही जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील माझ्यावर विश्वास असल्यानं मी सोबत आहे," असं त्यांनी स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला.
मोठं शक्ती प्रदर्शन कशासाठी? :एक जानेवारी रोजी आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात जंगी कार्यक्रम घेतले जातात. मात्र, यंदा त्यांच्या मतदारसंघाबाहेर शहराच्या मुख्य ठिकाणी असलेल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे त्यांनी हा जाहीर कार्यक्रम केला. हजारो लोक त्यासाठी त्यांच्या मतदारसंघातून आले होते. मोठा स्टेज त्यावर त्यांचे समर्थक, नेते यांचा मोठा भडीमार दिसून आला. तर कार्यक्रमाच्या आधी आणि शेवटी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आतिषबाजी हा एक शक्तिप्रदर्शनाचा भाग होता. शिवसेना आमदार असले तरी त्यांच्या पक्षाच्या कुठल्याच नेत्याचा फोटो बॅनरवर किंवा कार्यक्रम स्थळी लावण्यात आला नव्हता. तिथे उभारण्यात आलेले झेंडे हे देखील सत्तार यांच्या फोटोचे होते. जाहीर कार्यक्रमात ते आपली वेगळी भूमिका घेतील काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांनी त्याला पूर्णविराम देत कुठेही जाणार नाही, असं सांगितलं. त्यामुळे एवढे शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.