छत्रपती संभाजीनगर :राज्यातील राजकारणात मोठे बदल घडतील, असे संकेत राज्यातील मंत्री देत आहेत. त्यात आता महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही, असं विधान समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. त्यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थानिक पातळीवरील निवडणुकांबाबत वेगळा निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली, तरी आम्ही सोबत आहोत, असं मत व्यक्त केलं. दोन्ही पवार एकत्र येण्यावरुन संजय सिरसाट यांनी भाष्य केलं. यावर बोलताना संजय शिरसाट हे भविष्यकार असतील, मला माहीत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
ठाकरे सोबत कोणीही नसल्यानं एकटे :आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. त्यावर "यांच्यासोबत कोणीही नसल्यानं आता त्यांना तसं बोलावं लागत आहे," अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. "त्यांच्याकडं काही उरलं नाही, सोबतचे सोडून जात आहेत. आपल्यासोबत कुणी नाही, एकटं जावं लागेल म्हणून ते आता एकटं निघत आहेत. त्यांना स्वबळावर लढावंच लागेल. काँग्रेस नाही, शरद पवार नाही, म्हणून स्वबळावर, त्यांना आता पर्याय उरला नाही. महाविकास आघाडी संपली, काही उरलं नाही. ठाकरेंना आता सिल्व्हर ओकचे देखील दरवाजे बंद झाले," अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तर "राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नाही, शत्रू ते लोक मानतात, ते मानणारे आता लाचारी पत्करतील. मात्र भाषा बदलून उपयोग नाही. स्वाभिमान शिल्लक असेल, तर स्वतंत्र लढाच", असं आव्हान देखील त्यांनी उबाठाला दिलं.